Breaking News

पुढच्या दसरा मेळाव्याला महंतच मुलगी म्हणून गडावर बोलवतील : पंकजा

अहमदनगर, दि. 12 -  पुढच्या दसर्‍याला भगवानगडाच्या गादीवर बसलेले महंतच मला मुलगी म्हणून बोलवणार आहेत, याचा मला विश्‍वास आहे, असे  म्हणत पंकजा मुंडे यांनी वादावर भाषण केले आहे.  दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या समाधीचें दर्शन घेतल्यानंतर गडाच्या पायथ्याखाली  घेतलेल्या सभेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. मात्र यावेळी त्यांनी नामदेवशास्त्रींची भेट घेण टाळले.
पंकजा मुंडे आज आपल्या लाखो कार्यकर्त्यांसह भगवानगडावर पोहोचल्या. भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या हेलिपॅडवर उतरल्यानंतर पंकजा मुंडे,  प्रीतम मुंडे यांनी भगवानगडापर्यंत खास रथातून रॅलीही काढली. यावेळी पंकजा यांचे पती अमित पालवे, राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि रासप नेते महादेव  जानकर, पणनराज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासह दिग्गज नेत्यांची हजेरी होती.
पंकजा मुंडे यांना रॅलीतून भगवानगडावर पोहोचायला जवळपास पाऊण ते एक तास लागला. वाटेत पंकजा समर्थकांनी पंकजांच्या नावाच्या घोषणाही दिल्या.  त्यामुळे आख्खा भगवानगड आज पंकजामय झाल्याचे वातावरण दिसत होते. यंदाचा दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे गडावर न होता पायथ्याशी झाला.  भगवानगडाचे मंहत नामदेवशास्त्री यांच्यासोबतच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पंकजा मुंडेंना गडावर नाही तर पायथ्याखाली सभा घ्यावी लागली.