Breaking News

युती मोडाल, तर सेनेचे सर्जिकल स्ट्राईक दाखवू : उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 12 - शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. सर्जिकल  स्ट्राईक, मराठा आरक्षण, कार्टून वाद आणि आगामी महापालिकेच्या निवडणुका या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली.
भारताने उरी हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केले आहे. भारतीय सैन्य दल आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी उद्धव ठाकरेंनी जाहीर अभिनंदन केलें आहे. यावेळी रेसकोर्सवर ‘वॉर म्युझियम’ बनवण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
दुसरीकडे या सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेत त्याचे राजकराण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. कठिण परिस्थितीत भारतीय  जवान सीमेवर देशाचे रक्षण करतात. कोणताही भारतीय त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाही, त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकवर कारवाईवर संशय घेणार्‍यांचे मेंदू  सडलेले आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा समाचार घेतला. आहे.
राज्यभरातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपला सूचक इशारा दिला. हिंमत असेल  तर युती तोडा आणि मग अंगावर या, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.
शिवसेना विधानसभेच्या वेळी गाफिल राहिली. कारण 25 वर्षांपासूनचा मित्र पाठिवर वार करिन असा विचारही केला नव्हता, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी  भाजपवर निशाणा साधला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युतीसाठी मागे लागणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.