लष्करी कारवाईबद्दल सांगलीत आनंदोत्सव
सांगली, दि. 01 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याचा आनंद व्यक्त करत शिवसेनेतर्फे मारुती चौकात साखर वाटण्यात आली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत भारतीय लष्कराचे अभिनंदन करण्यात आले.दसर्यापूर्वी सीमोल्लंघन करुन सैन्याने पाकला ठेचून काढले. त्याचा अभिमान आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन अशा शब्दांत माजी आमदार संभाजी पवार यांनी आनंद व्यक्त केला. सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. तरुणाई रस्त्यावर उतरली. महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. भारत माता की जय, वंदे मातरम्, भारतीय जवानांचा विजय असो, पाकिस्तान मुर्दाबाद, अशा घोषणांनी चौक दणाणून सोडला. रात्री सव्वाआठ वाजता जल्लोषाला सुरुवात झाली. सांगलीकरांनी सहभाग घेतला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी पृथ्वीराज पवार, गोपाळ पवार, शिवराज बोळाज, विजय मुळे, सोमशेखर पाटील, कैलास पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, सॅमसन तिवडे, प्रमोद कुदळे, रामचंद्र देशपांडे आदी सहभागी झाले. इस्लामपूरात आतषबाजी ः भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला केल्याचा आनंद आज येथे युवकांनी साजरा केला. यल्लम्मा चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. यल्लाम्मा चौकात महेश माळी, रवी सुर्यवंशी, गजानन फल्ले, पार्थ शेटे, प्रवीण घोरपडे, डॉ. उदय माने, विनायक माळी, समीर करांडे आदी युवकांनी फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद साजरा केला.
