विभागीय नियंत्रकाच्या झोपेने बस स्थानकाचे झाले तीन तेरा
परभणी, दि. 01 - येथिल जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकाला विभागीय नियंत्रकांच्या नियोजनशुन्य कारभाराने काळीमा फासली असुन सोयी सुविधांच्या नावाने प्रवाशांची ससेहोलपट होत असतांना दिसुन येत आहे.आपल्या अनागोंदी कारभाराचे खापर तत्कालीन अधिकार्यांच्या माथ्यावर फोडुन विद्यमान विभाग नियंत्रक आपल्या कर्तव्या पासुन हात झटकत असल्याचे दिसते. परिसरातील जमिन सपाटीपेक्षा खाली असलेल्या बस स्थानकाला पावसाच्या पाण्यामुळे बेटाचे रूप प्राप्त झाले असुन बस स्थानकाच्य परिसरात घाण पाणी व केर कचर्याचे ढेर लागले आहेत. सर्वत्र पावसाचे पाणी साठल्याने या परिसराला उग्र दुर्गंधी सुटली असुन प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बस स्थानकातील वातावरण सदैव दमट राहत असल्याने प्रवाशांना व नागरिकांना श्चसनाचे आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अल्पशा पावसाने बस स्थानकात सर्वत्र पाणीच पाणी होत असल्याने परिसरातच असलेल्या डिग्गीच्या नाल्याचे घाण पाणी मोठ्या प्रमाणावर बस स्थानकात शिरत आहे. दुगंधीयुक्त हे घाण पाणी थेट स्थानकात असलेल्या उपहार गृहासहीत बस स्थानकात दाखल होत आहे. बस स्थानकाच्या छतालाही गळती लागल्याने प्रवाशी कोरड्या जागेच्या शोधात सम्पुर्ण बस स्थानक पायाखाली घालत आहेत. शोधला तर एक वेळ देव सापडेल परंतु परभणीच्या बस स्थानकात प्रवाशांना बसची वाट पाहात बसण्यासाठी कोंरड्या जागेचा शोध काही लागेना अशी दयनिय अवस्था बस स्थानकाची झाली असुन कागदी घोडे बाजार चालवणार्या या विभागीय जिल्हा मध्यवर्ती बस स्थकातील अधिकार्यांना मात्र या गोष्टींचे सोयर सुतक राहीले नसल्याचे दिसते.जिल्हयाचे पालक मंत्री तथा परिवाहन राज्य मंत्री दिवाकर रावते आपल्या प्रशासकीय कामा निमित्त नेहमीच परभणीत दाखल होत असतात परंतु येथिल लोकप्रतिनिधींनी या प्रकाराची साधी तक्रारही त्यांच्या कानावर घातली नाही. अथवा कोणत्याही सुज्ञ प्रवाशी नागरिकाने याची दखल घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला नाही.परभणीकरांची संवेदना संपली की न्याय हक्कासाठी अंगात असलेला ताठर बाणा निकामी झाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असुन जनप्रक्षोभ उसळण्या अगोदर विभागीय नियंत्रकांनी या प्रकरणी लक्ष घालुन सोनाराने कान टोचण्या पुर्वीच आपल्या कर्तव्याची बुज राखावी व नागरिकांना तसेच या स्थानकातुन हजारेांच्या संख्येने प्रवास करणार्या प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सर्व सामान्य प्रवाशांकडुन होत आहे.
