Breaking News

निमणीत भिंतीला भगदाड पाडून बँक फोडली

निमणी (ता. तासगांव), दि. 01 -  येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून फोडली. मात्र सायरन वाजल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. सायरनमुळे घाबरुन चोरट्यांनी बँक फोडण्यासाठी आणलेली हातोडी, छन्नी व एक्सा ब्लेड तेथेच टाकून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच तासगांव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन श्‍वानपथकाव्दारे तपास सुरु केला. मात्र चोरटे सापडले नाहीत. अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
निमणी येथे तासगांव, भिलवडी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. रात्री चोरट्यांनी हातोडा, छन्नी व एक्साव्दारे या बँकेच्या मागील बाजूच्या भिंतीला दोन चौरस मीटरचे भगदाड पाडले. त्यानंतर कुलूप तोडून लॉकर व तिजोरी असणार्‍या खोलीत प्रवेश केला. यावेळी लॉकर उघडण्यासाठी त्यांनी हात लावताच बँकेचा सायरन वाजू लागला. आवाजाने बाहेरील कुत्रीही भुंकू लागल्याने चोरट्यांनी घाबरुन, सर्व सामान तिथेच टाकून पळ काढला. यावेळी तेथे रक्त पडल्याचेही डाग आढळून आले आहेत.
सायरनच्या आवाजाने बँकेचा शिपाई दिलीप मोहिते याने गावकर्‍यांसह बँकेकडे धाव घेतली, तसेच शाखाधिकारी विलास पाटील यांच्या मोबाईलवर मेसेज गेला.
या घटनेची माहिती तासगांव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन श्‍वानपथकाव्दारे तपास सुरु करण्यात आला. बँकेपासून दोन किलोमीटरवर नागावच्या आडके वस्तीपर्यंत श्‍वानाने माग काढला. मात्र चोरटे सापडले नाहीत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर, काहीही रक्कम चोरीला गेली नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.