Breaking News

झेडपीच्या यांत्रिकी विभागाच्या उपअभियंत्याचा होरपळून मृत्यू

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीलगतच्या यांत्रिक विभागात बुधवारी रात्री आग लागली. या  घटनेत उपअभियंता एन. व्ही. गांगुर्डे (मूळ रा. नाशिक) यांचा होरपळून मृत्यू झाला. यांत्रिकी विभागत लागलेली आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आणण्याचे काम  सुरू होते. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे  यांनी घटनास्थळास भेट दिली. 
सातारा जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत यांत्रिक विभाग आहे. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या यांत्रिक विभागातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.  रात्रीची वेळ असल्याने व यांत्रिक विभाग अडगळीच्या परिसरात असल्याने त्याबाबतची नेमकी माहिती लवकर लक्षात आली नाही. अल्पावधीत परिसरातून धुराचे  लोट वाहू लागल्याने आग लागली असल्याचे निदर्शनास आले. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या घटनेची माहिती अग्निशामक दल व जिल्हा परिषदेतील  वरिष्ठ अधिकारी व पदाधिकार्‍यांना देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
यांत्रिक विभागात प्रवेश केल्यानंतर घटनास्थळी एका व्यक्तिचा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह एन. व्ही. गांगुर्डे या उपअभियंत्यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या  घटनेची माहिती जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यांत्रिक विभागात गांगुर्डे हे संगणकावर काम करत बसले होते.  त्यांचा सहकारी गेल्यानंतर ते विभागात एकटेच बसले होते. शॉर्टसर्किट झाल्यानेच ही दुर्घटना घडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. दरम्यान, गांगुर्डे  हे मुळचे नाशिक येथील असून 1 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा परिषदेत रूजू झाले होते.