Breaking News

भव्य दिंडी सोहळा मिरवणुकीने अवतरली अवघी पंढरी

अहमदनगर, दि. 28 - हातात भगव्या पताका, महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन विविध रंगी साड्या परिधान करुन मिरवणुकीत सहभागी झालेले महिला  भजनी मंडळ, टाळ, मृंदग हाती घेतलेले वारकरी पथक, अन, भजने, अभंग, ओव्या, म्हणत जयजय रामकृष्ण हरि, विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल असा  विठ्ठुनामाचा जयघोष करित निघालेल्या शेकडो भाविक भक्तांमुळे अवघ्या नगर शहरात जणु पंढरीच अवतरली होती.
नगर जिल्हा वारकरी सेवा संघाच्या वतीने बडी साजन सांस्कृतिक भवनात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी 4 वाजता  नगर शहरात भव्य दिंडी सोहळा मिरवणुक काढण्यात आली होती. हातात वारकरी सांप्रदयाचे प्रतिक असलेले भगवे ध्वज, डोक्यावर तुळशीवृंदान होऊन सहभागी  झालेल्या महिला, रेणुका, राधेशाम, संत मुक्ताई, पसायदान, श्री सावता माळी (भिंगार), श्री संत सावता महाराज (माळीवाडा) इत्यादी भजनी मंडळातील शेकडो  महिला, नादब्रम्ह वारकरी शिक्षण संस्था (ताड बोरगाव जिल्हा परभणी) व माऊली सद्गुरु धाम वारकरी पाठशाळेचे विद्यार्थी, वीणा, टाळ मृदंग, पथक, व फुलांनी  सजवलेल्या रथावर आरुढ झालेली पांडूरंगाची प्रतिमा या भव्य मिरवणुकीचे आकर्षक होते.
विठ्ठल नामाचा जयघोष करत व अभंग, ओव्या, भजन, भारुड म्हणत. आणि पावली व फुगड्या खेळत  हि मिरवणुक आनंदऋषी हॉस्पिटल, चाणक्य चौक, आनंद  धाम मार्गे, बडी साजन सांस्कृतिक  भवनात पोहचली. आनंदधाम समोरील पटांगणात वारकरी पथकातील विद्यार्थी, भजनी मंडळातील महिलांनी गोल रिंगन करुन  फुगड्या खेळल्या.नगर  जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष विश्‍वनाथ अण्णा राऊत यांच्या निवासस्थानी सर्व भाविकांनी चहापान करण्यात आले. तेथे गायनाचार्य  ह.भ.प. पंढरीनाथ महाराज कदम यांनी गवळणी सादर केल्या तर अनिता सुडके व सुरेखा बेरड यांनी संत एकनाथांचे ‘दादला नको गं बाई’, हे सोंगी भारुडसादर  केले.
ही मिरवणुक बडी साजन सांस्कृतिक भवनात  आल्यानंतर अन्नदाते विलास आगरकर तसेच रेणुका, राधेशाम, संत मुक्ताई, श्री संत सावता (भिंगार) श्री संत  सावता महाराज (माळीवाडा) व कपिलेश्‍वर महिला भजनी मंडळाचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन ह.भ.प. विश्‍वनाथ अण्णा राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात  आला. ह.भ.प.विश्‍वनाथ अण्णा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प. राम हरि काजळे, व ह.भ.प. हिराताई मोकाटे यांनी या दिंडी मिरवणुकीचे नियोजन केले  त्यांना सुभाष राऊत, सतिश राऊत, पोपटराव कुलकर्णी यांनी सहकार्य केले.