Breaking News

दिवाळी बोनसमध्ये मालकाची खैरात, कर्मचार्‍यांना कार गिफ्ट

सुरत, दि. 28 - ‘भगवान देता है तो छप्पर फाड के देता है’ ही म्हण सुरतमधल्या एका हिरे व्यापार्‍याने खरी ठरवली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सावजी ढोलकिया या व्यापार्‍याने कर्मचार्‍यांना बंपर बोनस दिला आहे. ढोलकियांनी 1260 कर्मचार्‍यांना कार गिफ्ट केली आहे, तर 400 कर्मचार्‍यांना घरखरेदी करण्यात मदत केली आहे. सुरतच्या श्रीहरी कृष्णा डायमंड एक्स्पोर्ट कंपनीचे चेअरमन सावजी ढोलकिया यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना सलग दुसर्‍या वर्षी खुश केलं आहे. गेल्या वर्षीही या कंपनीतील एकूण 1201 कर्मचार्‍यांना या बंपर बोनसचा लाभ मिळाला होता.
ढोलकिया यांच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर 6 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यांचा व्यवसाय 71 देशांमध्ये विस्तारला आहे. ढोलकियांच्या कंपनीमध्ये सुमारे साडेपाच हजार कर्मचारी काम करतात. काही कर्मचार्‍यांना गेल्या वर्षी बोनसच्या रुपात कार देण्यात आली होती, तर काहींचा यावर्षी नंबर लागला आहे.
गेल्या वर्षी 491 कामगारांना कार भेट मिळाली होती. तर 207 कामगारांना दोन बेडरुमचा फ्लॅट दिवाळीचा बोनस म्हणून देण्यात आला होता. 503 कर्मचार्‍यांना दागिने भेट म्हणून देण्यात आले होते. ढोलकियांनी दिलेल्या बोनसमुळे कर्मचार्‍यांमध्येही नवा उत्साह संचारला आहे. पुन्हा सरप्राईज गिफ्ट मिळेल, या आशेने कर्मचारी जोमाने कामाला लागले आहेत.