Breaking News

करंजेच्या फरारी शिक्षकास अटक

प विटा, दि. 24 - करंजे (ता. खानापूर) येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरारी शिक्षक गणेश ुर्फ ओंकार दत्तात्रय गायकवाड  (26, रा. शेटफळे, ता. आटपाडी) याला विटा पोलिसांनी गजाआड केले. गेल्या महिन्याभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. विविध सामाजिक संघटनांनी  पोलिसांच्या तपासाबाबत शंका उपस्थित केली होती. त्याला 26 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. करंजे येथील एका  विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थी व शिक्षक गायकवाड या दोघांनी लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी विटा  पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थ्यास अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणातील शिक्षक गणेश गायकवाड फरारी झाला होता. पोलिसांनी  त्याचा आटपाडी, सांगली, विटा, पुणे, मुंबई आदींसह विविध ठिकाणी शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी सुनीता मोरे, मनसेचे  अमर पडळकर, रासपचे डॉ. संजय लवटे, अभिजित तुराई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीची विटा ग्रामीण  रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली होती, परंतु त्याचा अहवाल वस्तुनिष्ठ दिला नसल्याची शक्यता व्यक्त करीत मोरे यांनी पीडित मुलीची पुन्हा सांगलीच्या  शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यास भाग पाडले. त्यानंतर तेथील वैद्यकीय अहवाल वस्तुनिष्ठ आला. अखेर वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन जाधव,  सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्निल घोंगडे यांच्यासह पोलिसांनी शिक्षक गायकवाड याला सकाळी आटपाडी येथे अटक केली. त्याला सांगलीच्या न्यायालयात  हजर केले असता, 26 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.