Breaking News

बाजार समितीच्या तिघांकडे 57 लाखांची बेहिशेबी रोकड

नाशिक, दि. 27 - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन कर्मचार्‍यांना 57 लाखांची बेहिशेबी रोकड घेऊन जात असताना पेठरोड येथे  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात  रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या देयक व इतर बिलावर  बळजबरी स्वाक्षर्‍या करून सुमारे 57 लाखांची रोकड परस्पर काढून घेतल्याची निनावी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार  पेठरोड परिसरात पथकाने सापळा रचला. संशयित स्विफ्ट डिझायर कार (एमएच 15, पीएम 2180 )ला पेठरोड येथे थांबवण्यात आले. कारच्या झडतीमध्ये रक्कम  आढळून आली. त्याबाबत विचारले असता संबंधित कर्मचार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने लेखाधिकारी अरविंद जैन, स्टेनो विजय निकम, लिपिक  दिगंबर चिखले यांना ताब्यात घेत म्हसरूळ पोलिस ठाण्यात नेले. पोलिस निरीक्षक पी. टी. धोंडे, मृदुला नाईक, महेश नांदुर्डीकर, दौलत जाधव यांच्या पथकाने ही  कारवाई केली. दरम्यान, ही रक्कम बाजार समितीच्या एका ‘बड्याङ्क पदाधिकार्‍याच्या घरी जाणार असल्याची शक्यता पथकाने व्यक्त केली. या प्रकरणामुळे  बाजार समिती संचालकांसह कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.