Breaking News

केडगाव येथे नवरात्रोत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)। 28 - नगरपासून अवघ्या चार कि.मी.अंतरावर असणार्‍या केडगावच्या रेणुकामाता मंदिरात नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणी होणार्‍या दहा दिवसांच्या उत्सवासाठी शहरासह जिल्हाभरातून भाविक मोठया संख्येने हजेरी लावतात. 
साडेतीनशे वर्षांपेक्षा अधिक पुरातन असणार्‍या व हेमाडपंथी प्रकारात मोडणारे केडगावचे रेणुकामातेचे मंदिर वर्षभर भक्तांच्या गर्दीने फुलून जाते. नवरात्रात हा मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने खुलून जातो. या मंदिरात वंशपरंपरेने गुरव कुटुंबीय पूजा-अर्चा करत आहे. येत्या शनिवारी मंदिरात सकाळी साडेआठला घटस्थापना होणार आहे. सध्या त्याचीच तयारी सुरु आहे. मंदिर परिसराला रंगरंगोटी तसेच साफ-सफाई सजावट अशी कामे वेगात सुरु आहेत.आदल्या दिवशी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते.
दरवर्षी भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यावेळीही मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आणि पुरूषांसाठी दर्शन रांगही स्वतंत्र राहणार आहे. देवीचा मुख्य गाभार्‍याचा मागेच विस्तार करण्यात आल्याने सर्वांना कितीही गर्दी झाली तरी सुलभतेने दर्शन घेता येते. पाचव्या माळेला पंचमी असून शहापूरचे दत्त दिगंबर महाराज यांच्या उपस्थितीत ललित पंचमी व श्री यंत्राला कुंकुम तिलक करण्यात येते. हा कार्यक्रम सकाळी दहा ते साडेअकराच्या दरम्यान होईल. सायंकाळी सातला भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबरला सातव्या माळेला देवीची यात्रा भरत असते. यादिवशी देवीला फुलोराचा प्रसाद चढवला जातो. तसेच देवीला महाभिषेक करण्यात येतो.भाविकांच्या सोयीसाठी शहर व बस वाहतुक शाखेतर्फे बसेसची व्यवस्था करण्यात येते तसेच मोठा पोलिस बंदोबस्त नेमण्यात येतो. रस्त्यावर भाविकातर्फे महाप्रसाद व पाण्याचे वाटप केले जाते.