Breaking News

शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगांद्वारे विकासाला दिशा देऊ या - राज्यमंत्री खोतकर

मुक्तीसंग्राम दिनी राष्ट्रध्वज वंदन; हुतात्म्यांना पुष्पचक्र, मानवंदनेने आदरांजली

नांदेड, दि. 17 :- आगामी काळात शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग तसेच वनउपजाद्वारेही रोजगार निर्मिती यांसह पशुसंगोपन व्यवसायासाठी नियोजनपुर्वक प्रयत्नातून जिल्ह्याच्या विकासासाठी दिशा देण्याचा प्रयत्न केले जातील, असा विश्वास वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे व्यक्त केला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ मोठया दिमाखात संपन्न झाला. या समारंभात शुभेच्छापर संदेश देताना श्री. खोतकर बोलत होते. यावेळी उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली तसेच मानवंदना देण्यात आली.
ध्वजवंदनापुर्वी राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा परिषदच्या अध्यक्ष मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा स्वामी, स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी नारायणराव भोगावकर, आमदार अमर राजुरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, मनपाआयुक्तसमीर उन्हाळे,गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक संदिप डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, पदाधिकारी, अधिकारी व जेष्ठ नागरिकांनीही पुष्पअर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
शुभेच्छापर संदेशात राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी नांदेड जिल्ह्याने मराठवाडा मुक्तीसंग्रामात धडाडीने सहभाग नोंदविला असून, मुक्तीसंग्रामातून ध्येयाप्रती सर्वस्वाचा त्याग करण्याची प्रेरणा घ्यावी लागेल असे नमूद केले. श्री. खोतकर पुढे म्हणाले की, गेली तीन वर्षे निसर्गाने अवकृपा केलीहोती, पण यंदा चित्र वेगळे आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे, तर वेळेवर पेरण्या झाल्यामुळे पीक परिस्थिती चांगली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात उत्कृष्ट कामे झाली आहेत. त्यांचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. लोकसहभाग, जिल्हा प्रशासनाचे सुनियोजन आणि विविध घटकांचा सकारात्मक प्रतिसाद यांना अभियान यशस्वी करण्याचे श्रेय द्यावे लागेल. आगामी काळात जलसंवर्धनाची ही लोकचळवळ अशीच संवर्धित करुया, असे आवाहनही त्यांनी केले.
यापुढे कृषी क्षेत्राशी निगडीत विविध उपक्रमांवर भर द्यावा लागणार असल्याचे सांगून श्री. खोतकर म्हणाले की, शेतीमालाची साठवणूक, कृषि प्रक्रिया उद्योग तसेच शेतकर्‍याला बाजारपेठेशी संलग्न करणे, शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी शेतीपूरक उद्योग तसेच वनउपजाद्वारेही रोजगार निर्मिती यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पशूधन आणि त्यातील वैविध्य हे शेतीसाठी पूरक अशा उद्योगासाठी मोठी संधी असणारे क्षेत्र आहे. त्यामुळे पशुसंगोपन हा जोडधंदा न राहता तो मुख्य व्यवसायही होऊ शकतो. त्यासाठी पशुपालकांना प्रयोगशीलतेसाठी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे धोरण राहील असेही त्यांनी सांगितले.
हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभासमोर पोलीस दलाच्या पथकाने सावधान सलामी, शोकशस्त्र, सलामी शस्त्र आणि मान्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. पोलीस वाद्यवृंद पथकानेही बिगूल धून वाजवून सलामी दिली. यावेळी सर्व उपस्थितांनीही हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे वंदन आणि राष्ट्रीय सलामी झाली. याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्यसेनानीयांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी स्वातंत्र्य सेनानी व जेष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देतानाचत्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. पोलीस निरीक्षक शामराव राठोड यांनी परेड कमांडर म्हणून संचलन केले.व्यंकटेश चौधरी, सुधीर रावळकर, स्नेहलता स्वामी यांनी समारंभाचे सुत्रसंचालन केले. या समारंभास नागरिक, विविध शाळेतील विद्यार्थी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.