नंदगिरी किल्ल्याच्या जतन-संवर्धनासाठी सर्वोतोपरी सहकार्य - राज्यमंत्री खोतकर
गड-किल्ले स्वच्छता अभियानास प्रारंभ
नांदेड दि. 17 :- नांदेडचे वैभव असणार्या नंदगिरी किल्ल्याच्या जतन-संवर्धनासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल , असे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे सांगितले. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये महाराष्ट्र राज्य व गडसंवर्धन समिती महाराष्ट्र राज्य तसेच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गड-किल्ले स्वच्छता अभियानांतर्गत नंदगिरी किल्ला प्रांगणात स्वच्छता मोहिमेस राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमास आमदार हेमंत पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मनपा आयुक्त समीर उन्हाळे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी भुजंग पाटील, मिलिंद देशमुख आदींसह महापालिकेचे अधिकारी आदींचीही उपस्थिती होती. यावेळी बोलतांना राज्यमंत्री खोतकर पुढे म्हणाले की , गड-किल्ल्याचा हा प्राचीन वारसा जतन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यासाठी राज्य सरकारही प्रयत्नपुर्वक धोरणे राबवित आहे. या वारश्यांचे जतन-संवर्धन आता आधुनिक विचारांप्रमाणे करावे लागेल. परिसरातील नागरिकांना याठिकाणी उभ्या राहणार्या इमारतीद्वारे अभ्यासिका, ग्रंथालय, संगणक-शाळा यांद्वारेही सुविधा देता येऊ शकतात. त्यामुळे प्राचीन-ऐतिसाहिक ठेवा आणि नवीन विचारांची सांगड घालून, संवर्धन-जतनाचे प्रयत्न व्हावेत. नंदगिरी किल्ला हा नांदेडचे वैभव आहे. त्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्धतेबाबत सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. अशा प्राचीन स्थळांच्या स्वच्छतेसाठी सर्वच यंत्रणांनी जाणीवपुर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार पाटील यांनी यावेळी नंदगिरी किल्ला महाराष्ट्रासाठी प्राचीन ठेवा असल्याचे सांगतानाच, किल्ल्याच्या जतन-संवर्धन आणि तेथील विविध सुविधांसाठी भरीव निधीची गरज असल्याचे, प्रतिपादन केले. या अभियानांतर्गत जिल्ह्यात नंदगिरी किल्ल्यासह, कंधारचा किल्ला, माहूरगड येथेही स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यमंत्री श्री. खोतकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किल्ल्यातील स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. तसेच किल्ल्यातील विविध भागांची पाहणीही करण्यात आली. दिवाकर चौधरी यांनी सुत्रसंचालन केले. मनपा आयुक्त श्री. उन्हाळे यांनी आभार मानले. धनेगावमधील सांस्कृतिक सभागृहाचे राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण
मौजे धनेगाव येथे आमदार हेमंत पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी भुजंग पाटील, मिलिंद देशमुख, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार पी. के. ठाकूर, स्थानिक पदाधिकारी, नागरीक आदींचीही उपस्थिती होती.