Breaking News

मंत्रालय इमारतीच्या नुतनीकरणातही घोटाळ्याचा धूर

सार्वजनिक बांधकाम : भुजबळांचे आणखी एक प्रकरण चव्हाट्यावर

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 28 - सार्वजनिक बांधकाम खात्यातील विविध घोटाळ्यांसोबत महाराष्ट्र सदन गैरव्यहारप्रकरणी अडचणीत येवून आर्थर रोड मध्यवर्ती काराग्रुहात असलेले भुजबळ काका पुतण्या आणखी अडचणीत येण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे मंत्रालय इमारत नुतनीकरण प्रकरणी चव्हाट्यावर येत असलेल्या या नव्या प्रकरणाशी केवळ  भुजबळ यांचाच थेट संबंध स्पष्ट झाल्याने गांभीर्य वाढले ररहश.
आगीनंतर नूतनीकरण केलेल्या मंत्रालय इमारतीसाठी बांधकाम मजबुती प्रमाणपत्र (स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) घेतल्यानंतर, आता या इमारतीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारच नेमला नव्हता, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली आहे. त्यामुळे मंत्रालय इमारतीच्या बांधकाम सुरक्षिततेची हमी कोण घेणार, असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. तब्बल 260 कोटी रुपये खर्चून इमारत नूतनीकरणाचे काम कोणाच्या देखरेखीखाली केले गेले? यामागे नेमके कोण अधिकारी आहेत, असे प्रश्‍न असून, याची एसीबीमार्फत चौकशी केल्यास अनेक बडे अधिकारी यात अडकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मंत्रालयाला आग लागल्यानंतर जुनी इमारत पाडून पुन्हा नव्याने बांधायची की, आहे त्या इमारतीचेच नूतनीकरण करायचे? असा प्रश्‍न आला, तेव्हा नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, असा आग्रह तत्कालीन बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी धरला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हे काम भुजबळांच्या नेतृत्वाखाली होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी खासगी विकासकाकडून निविदा मागविण्याचा निर्णय घेतला. खासगी आर्किटेक्टची नेमणूक निविदा प्रक्रीया करून पूर्ण करावी, असे प्रधान सचिवांनी लेखी कळवूनही भुजबळांनी हा प्रश्‍न प्रतिष्ठेचा करत, राजा अडेरी यांची नेमणूक स्वत:च्या सहीने कोणतीही विहीत शासकीय प्रक्रिया पार न पाडता करून टाकली. त्यातूनच पुढे खासगी विकासक युनिटी कन्स्ट्रक्शन्स आणि राजा अडेरी या दोघांमध्ये बांधकाम खात्याचे अधिकारी विभागले गेले आणि 260 कोटी रुपये खर्च करणार्‍या बांधकाम खात्याला सल्लागार राजे स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांचे अवघे अडीच कोटींचे देणे जड झाले आणि हा सगळा विषय बाहेर आला आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याची बोंब ठोकून ओबीसी समाजात गैरसमज निर्माण केले जात आहेत, भुजबळांवर नव्हे तर सकल ओबीसी समाजावर अन्याय अशी हाकाटी पिटवून भुजबळांच्या सुटकेसाठी नसती खटाटोप भुजबळ लाभार्थी करीत आहेत. प्रत्यक्षात भुजबळ लॉबीतच या मोर्चा संदर्भात मतभेद निर्माण होत असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभुमीवर मोर्चा यशस्वीतेवर शंका निर्माण होत असतांनाच  हे नवीन प्रकरण समोर आल्याने ओबीसी समाज बुचकळ्यात पडलाय.