Breaking News

नगरसेवकपद सोडवत नाही तेथे बारणे खासदारकीचा काय राजीनामा देणार

पुणे, दि. 29 - दैनिक सामनातील व्यंगचित्रावरून समस्त मराठा बांधवांच्या भावना दुखावल्या असताना शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे मात्र सोशल मीडियातील त्यांच्या राजीनाम्याच्या पोस्टवरच गुंतून राहिले आहेत. त्यांना समाजाच्या भावना महत्त्वाच्या वाटत नाहीत. खासदार झाल्यानंतर बारणे यांना साधा नगरसेवकपदाचा राजीनामा देता आला नाही. तेथे बारणे समाजासाठी खासदारकीचा काय राजीनामा देणार, अशी टिका वाकडमधील संदिप कस्पटे यांनी केली आहे.
 यासंदर्भात संदिप कस्पटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दैनिक सामनामध्ये मराठा मूक मोर्चाबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र छापण्यात आले. त्याबाबत मराठा समाज बांधवांमध्ये संतापाची भावना आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये लाखोंचे मोर्चे निघत आहेत. अशावेळी सामनाने छापलेल्या व्यंगचित्राचे निश्‍चितच कोणीही समर्थन करू शकणार नाही. या व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व खासदार, आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे सोपविले असल्याचे वृत्त सर्वत्र झळकत आहेत.
 मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. परंतु, त्यांनी त्याचा इन्कार केला आहे. सोशल मीडियावर फिरणारी पोस्ट ही कदाचित मराठा बांधवांची मागणी असू शकते. बारणे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन आपण समाजासोबत आहोत हे दाखवून द्यावे, अशी समाजाची भावना आहे. केवळ एका पोस्टमुळे मनस्ताप सहन करणार्‍या बारणे यांनी व्यंगचित्रामुळे मराठा समजाला काय त्रास सहन करावा लागला, असेल याचा विचार करण्याची गरज आहे.
समाजाच्या भावनांची कदर करून बारणे यांनी शिवसेनेकडे खासदारकीचा राजीनामा दिला असता, तर त्यांचीच मान उंचावली असती. परंतु, तसे न करता सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे ते हादरले. समाजाचा कोणताही विचार न करता खासदारकीचा आपण राजीनामा देणार नसल्याचे सांगितले.
त्यामुळे खासदार बारणे यांच्या माध्यमातून राजकारण्यांचे खरे रूप समोर आले आहे. खासदार झाल्यानंतरही बारणे यांना साधे नगरसेवकपद सोडता आलेले नाही. त्यामुळे बारणे यांच्याकडून खासदारकीचे पद सुटेल, अशी मराठा समाजाने अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचे संदिप कस्पटे यांनी म्हटले आहे.