शेतकर्यांनी विमा, कर्जासंबंधी तक्रारी द्या
डी.एल.सी.सी. ची आढावा बैठक; खा. जाधव यांचे आवाहन
बुलडाणा, दि. 12 - सतत दोन ते तीन वर्षापासुन दुष्काळाशी दोन हात करणार्या शेतकर्यांना शासन विविध योजनांच्या माध्यमातुन सहकार्याची भुमिका निभावते. यात पिककर्ज, पिक विमा, दुष्काळ मदतनिधी यासह होतकरु तरुणांसाठी मुद्रा योजनेचा समावेश आहे. मात्र, या योजनांची अमंबलजावणी संदर्भात खा. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकर्स समितीची (डी.एल.सी.सी.) आढावा बैठक होणार आहे. यासाठी शेतकर्यांनी आपल्या तक्रारी खासदार जनसंपर्क कार्यालयात लेखी स्वरुपात द्याव्यात असे आवाहन स्वीयसहाय्यक डॉ. गोपाल डिके यांनी केले आहे.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या मुख्यालयाच्या सभागृहात 14 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हाअग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रोते यांच्यासह बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. यावेळी पंतप्रधान पिकविमा योजना, पिक कर्ज योजना तसेच खरीप 2015 विमा नुकसान भरपाई, खरिप 2015 दुष्काळनिधी वाटप यासह यंदाचे पिककर्ज नुतनीकरण, पुर्नगठण आणि मुद्रा योजनेचा सविस्तर आढावा खा.प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. शेतकरी बांधवानी उपरोक्त योजनासंबंधी लाभाच्या अडचणी असल्यास लेखी स्वरुपातील तक्रारी खासदार जनसंपर्क कार्यालयात 13 सप्टेंबर पर्यंत 5 वाजेपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
