Breaking News

‘जिजामाता’कारखान्याच्या मशिनरी चोरी; संस्थापिकेच्या पतीस अटक

सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) : कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील जिजामाता साखर कारखान्याच्या साडेतीन कोटी रुपयांच्या मशिनरीच्या चोरीप्रकरणी कारखान्याच्या सर्वेसर्वा अ‍ॅड. वर्षा माडगूळकर यांचा पती शिरीष अच्युतराव कुलकर्णी व तानाजी तुळशीराम कांबळे (दोघेही रा. सातारा) या भंगार व्यावसायिकाला अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
शिरीष कुलकर्णी हे कारखान्याच्या संस्थापक अ‍ॅड. माडगूळकर यांचे पती आहेत. कारखान्याच्या व्यवस्थापन समितीतील पदाधिकार्‍यांच्या नातेवाईकांला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. जिजामाता साखर कारखान्याच्या प्रमुख अ‍ॅड. वर्षा माडगूळकर (वय 43, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी कारखान्यातील मशिनरी चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर रहिमतपूरचे सपोनि गणेश कानुगडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यातून ही चोरी उघडकीस आली. चोरीला गेलेल्या 2 टर्बाइन पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. संशयितांना कोरेगाव न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे.