Breaking News

गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत गोसंवर्धनाचा संदेश

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) - डॉल्बीमुक्त, गुलालमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक काढताना प्रबोधनाचे आणखी एक पाऊल पुढे टाकत कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोलीतील श्री सिध्दनाथ मित्र मंडळाने गोसंवर्धनाचा संदेश जनतेला दिला. या अनोख्या मिरवणुकीने गावकर्‍यांची मने जिंकली.
वाठारमधील या मंडळाची 2009 मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून मंडळाने सामाजिक प्रबोधन व सामाजिक बांधिलकी जपण्याला प्राधान्य दिले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाने व्यसनमुक्तीचा संदेश देणारा जिवंत देखावा सादर केला होता. गुरूवारी मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक विशेष लक्षवेधी ठरली. डॉल्बीला व गुलालाच्या उधळणीला फाटा देवून मंडळाने नवा पायंडा घालून दिला. त्याचवेळी मिरवणुकीतून गोसंवर्धनाचा संदेश देण्याची अभिनव कल्पना मंडळाने राबवल्यामुळे या मिरवणुकीने गावकर्‍यांची मने जिंकली.
काळाच्या ओघात गोधन नामशेष होत चालले आहे. देशी गायींचे संवर्धन झाले पाहिजे हे लोकांना पटवून देण्यासाठी या मिरवणुकीत बेंदराप्रमाणे गायींची नटवून - सजवून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत लहानांपासून थोरांपर्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. युवती व महिलांचा सहभागही लक्षणीय होता. युवतींनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेतले होते. इतरांनी हातात ’गोहत्या टाळा, गाई वाचवा’, ’गोमाता हीच खरी माता’, ’गाई आणि आई, दोन्ही धरतीच्या माई’, ’गाईला त्रास, म्हणजे आईला त्रास’ अशा घोषणांचे फलक घेतले होते. मिरवणुकीत ध्वनीक्षेपकावरून गाईंच्या संवर्धनाचे महत्व सांगितले जात होते. या मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पवार, उपाध्यक्ष दीपक पवार, शिवसेना कराड उत्तर तालुकाप्रमुख विकास गायकवाड, अक्षय पवार, संजय पवार, निलेश पवार, नितीन जाधव, विजय पवार, संकेत पवार, विकास पवार, शशि पवार, अमय पवार, अभिषेक पवार, जीवन पवार, संजय मुळे, युवराज गायकवाड, सौरभ पवार, रहिमतपूर पोलीस ठाण्याचे रसाळ सहभागी झाले होते.