पै. किरण भगतने पटकावले अडीच लाखाचे इनाम
सह्याद्रि कारखान्यावरील कुस्ती मैदानात पवनकुमार झोळी डावावर चितपट
कराड, दि. 17 (प्रतिनिधी) : यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. पी. डी. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त व सह्याद्रि गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कुस्ती मैदानात महाराष्ट्रातील मोही गावचा मल्ल किरण भगत याने दिल्लीच्या सतपाल आखाड्याचा मल्ल पवनकुमार यास झोळी डावावर चितपट करत अडीच लाखाची कुस्ती जिंकत हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. खुडूसच्या महादेव सरगरला झोळी डावावरच चितपट करत चिलाईवाडीच्या माउली जमदाडेने द्वितीय क्रमांकाची कुस्ती जिंकली.अडीच लाख रुपये इनामाची प्रथम क्रमांकाची कुस्ती सह्याद्रि कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लावली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, सभापती देवराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, युवा नेते जशराज पाटील, संचालक मानसिंगराव जगदाळे, संजय जगदाळे, संजय थोरात आदींची उपस्थिती होती. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी प्रा. दिलीप पवार यांनी पंच म्हणून काम पाहिले, तर द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीसाठी डबल महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम यांनी पंच म्हणून काम पाहिले.
अनेक कुस्ती मैदाने गाजवणार्या आणि कुशल लढवय्ये असलेल्या किरण भगत आणि पवनकुमार या जोडीची प्रथम क्रमांकाची कुस्ती समालोचक शंकर पुजारी यांनी पुकारली. पवनकुमार याने पटाला लागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने एकेरी डावावर किरण भगतवर मात करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पटाची पकड सोडवत झोळी डावावर किरण भगतने पवनकुमार याला आसमान दाखवत मोही गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली. यावेळी कौस्तुभ ढापळे विरूध्द विजय गुटाळ या कुस्तीमध्ये कौस्तुभ ढापळेने केवळ अर्ध्या मिनिटाच्या आतच दुहेरी पटावर विजय मिळवला. पोपट घोडके (माळशिरस), रामदास पवार (पारगाव), संदीप काळे (पुणे), संभाजी पाटील (हेळगाव), उदय पवार (पारगाव), संतोष दोरवड (कोल्हापूर), रोहित मांडवे (कुंडल) यांनी चटकदार कुस्त्या करून विजय मिळवत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शरद ठोंबरे विरूध्द बाबू कोळी व महादेव माने विरूध्द नामदेव कोकाटे यांच्या कुस्त्या बरोबरीत सुटल्या. स्पर्धेचे समालोचन शंकर पुजारी कोथळीकर यांनी केले.
यावेळी आंतरराष्ट्रीय मल्ल काका पवार, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, हिंदकेसरी संतोष वेताळ, संपतराव जाधव, अशोक नाळे, अमोल साठे, विजय पाटील आदींसह सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक आर. सी. बडगुजर व कार्यक्षेत्रातील नामांकित पैलवान व कुस्ती शौकीन व सभासद उपस्थित होते.