Breaking News

बनावट नोटांचे रॅकेट पुन्हा सक्रिय

। दोन लाखांच्या नोटा जप्त । तिघांवर गुन्हा दाखल । दोघांना अटक । तोफखाना पोलिसांची कारवाई 

अहमदनगर (प्रतिनिधी) । दि. 18 - गेल्या 6 वर्षापुर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट पोलिसांनी उध्दस्त केले होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा शहरात बनावट नोटा चलनात आणणार्‍या तिघाजणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना बनावट नोटासह पकडण्यात आले. यामुळे बनावट नोटा तयार करणारे व बाजारात आणणारे रॅकेट पुन्हा कार्यरत झाले असल्याचे चर्चा नव्याने सुरु झाली आहे.
तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात संदेश बबनराव गवारे (नेवासा), विलास प्रभाकर प्रधान (कौडगाव), व प्रविण शशिकांत राऊत (केडगाव) अशी आरोपींची नावे असून गवारे वगळता दोघांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी घेतलेल्या झडतीत 2 लाख 9 हजार रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. ही कारवाई तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी रात्री 7 च्या सुमारास केली. या रॅकेटमध्ये अनेकांचा समावेश असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक मनोहर गोसावी यांनी फिर्याद दिली आहे.
तोफखाना पोलिस ठाण्याचे गस्तीपथक फिरत असतांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन पाईपलाईन रोडवरील प्रियदर्शनी हॉटेच्या परिसरात पोलिसांनी सापळा लावला.      त्यानूसार 7 च्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचे इसम आले. पोलिस निरीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पकडलेल्या दोघांनी अंगझडती घेतांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांची खात्री झाल्यानंतर अंगझडती घेतली असतांना दोघा आरोपींकडे 1 हजार रुपयांच्या 100 नोटांचे एक बंडल, 1 हजार रुपयांच्या नोटांचे 76 नोटांचे एक बंडल, अशा 176 नोटा तर 500 रुपयांचे 66 रुपयांच्या नोटांचा एक बंडल अशा 2 लाख 9 हजार रुपये बनावट असल्याचे आढळून आले. सदर आरोपींना बनावट नोटा असल्याचे माहिती असतांना सुध्दा त्यांनी त्या खर्‍या असल्याचे भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन चलनात येणार्‍या बनावट नोटा पकडल्या.
पुर्वी नगरमधील पद्मानगर परिसरात बनावट नोटांच्या कारखान्यावरच छापा मारुन हजारो रुपयांच्या बनावट नोटा व तयार करण्याचे साहित्य पकडले होते. या कारवाईनंतर बनावट नोटा बाजारात आल्या नाहीत. मध्यतरीच्या काळात बँका, पतसंस्था, व व्यापार्‍यांकडे बनावट नोटा (हुबे-हुब खर्‍या नोटा प्रमाणे) येत होत्या. मात्र, गुन्ह्याची व चौकशीचा ससेमिरा नको म्हणून संबंधीत स्वत: झळ पोहचवित असे. आजही अनेक ठिकाणी चलनामध्ये बनावट नोटा येत आहेत. प्रामुख्याने बँका, एटीएम मशीन मधून काढलेल्या नोटाच्या बंडलमध्ये एक ते दोन , पाचशे किंवा हजार रुपयांच्या बनावट नोटा निघतच आहेत. या पैसे काढणारा झळ सोसून तक्रार देत नसल्याने बंडलमध्ये बनावट नोटा घालणार्‍यांचे फावत आहेत. यातूनच बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट कार्यरत होत असल्याची चर्चा आहे.
शहरात अनेक ठिकाणी हवालाचे व्यवहार राजरोसपणे सुरु आहेत. बाजाराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरातील काही हॉटेल व लॉजवरती हवाला व खेळावरती सट्टा लावण्याचे प्रकार सुरु आहेत. याबाबत हद्दीतील पोलिसांना माहिती ही आहे मात्र, आर्थिक तडजोडीमुळे अशा प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. याचाच फायदा गुन्हेगारी स्वरुपातील इसम घेत असल्याचे पुढे आले आहे.
पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांनी अशा प्रकारच्या सट्टा बाजाराची तसेच पकडलेल्या पकडलेल्या आरोपीची कसुन चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका, सणासुदीच्या दिवसात बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.