Breaking News

’केबीसी’तील सहभागाबद्दल पोलिसाला पत्नीसह अटक

नाशिक, दि. 29 - राज्यातील बहुचर्चित केबीसी घोटाळाप्रकरणी नाशिक गुन्हे आर्थिक शाखेच्या पथकाने सातपूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी रमेश हरिभाऊ सोनवणे यांना पत्नीसह आज अटक करण्यात आली. जादा व्याजदर, दामदुपटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत सिंगापूरला पळून गेलेला केबीसी कंपनीचा मुख्य संचालक भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. 
सातपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी रमेश हरिभाऊ सोनवणे हेदेखील आपली पत्नी शोभा सोनवणेसह केबीसीत एजंट म्हणून सक्रिय होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात रमेश सोनवणे व शोभा सोनवणे यांच्या बँक खात्यात केबीसीमार्फत अनेक व्यवहार आणि पैसे वेगवेगळ्या मार्गांनी कंपनीच्या योजनांमधून प्राप्त झाल्याचे पोलिसांना आढळले; मात्र त्यांच्यावर थेट कारवाई केली नव्हती. त्यासंबंधीचे सर्व पुरावे गोळा केल्यानंतर सोनवणे व त्यांच्या पत्नीस काल चौकशीसाठी बोलविले असता त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळल्याने पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज रमेश सोनवणे व त्यांच्या पत्नीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.