Breaking News

हल्ल्याच्या निषेधार्थ पाळधीत कडकडीत बंद

जळगाव, दि. 29 - सरपंच निवडीच्या वादातून धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी कासट यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे गावात तणावाचे वातावरण असून या घटनेच्या निषेधार्थ आज गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे ग्रामस्थांनी यासंदर्भात दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना आज देण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील सरपंचपदाच्या निवडीचा वाद विकोपाला पोचला आहे. ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पॅनेलचे प्रमुख राजीव पंढरीनाथ पाटील यांनी त्यांचे 8 सदस्य चार दिवसांपूर्वीच बाहेरगावी सहलीला पाठविले आहे. याच गटातील वैशाली पाटील आणि श्रीवर्धन नन्नवरे हे दोघे सदस्य सर्वांसोबत सहलीला गेले नव्हते आता दोन दिवसांपूर्वी तेही अचानक गायब झाले. दोघे सदस्य कासट यांच्या सांगण्यावरुन सहलीला गेल्याची खदखद दोन दिवसांपासून गावात सुरू होती. त्यावरून मंगळवारी सकाळी त्यांच्या घरावर हल्ला चढवला होता. पाळधी औटपोस्टाला याप्रकरणी 14 संशयितांसह 70 ते80 गावकर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.