Breaking News

दलित संघटनांची शुक्रवारी बैठक



अहमदनगर (प्रतिनिधी) । 14
मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील विविध दलित संघटनांची एकत्रित बैठक येत्या शुक्रवारी होणार असून, बैठकीत नेत्यांच्या भावना जाणून घेवून पुढील दिशा ठरविली जाईल, अशी माहिती रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी दिली.
मराठा समाजाच्या वतीने येत्या 23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अँट्रॉसिटीच्या सर्मथनार्थ विविध दलित संघटनांच्या वतीने याच दिवशी मोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध संघटनेच्या नेत्यांची एकत्रित बैठक शुक्रवारी होणार आहे. बैठकीत मराठा क्रांती मोर्चाबाबत नेत्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. सवर्ण विरुध्द दलित असा वाद निर्माण होऊ नये, अशीच सर्वांची भूमिका आहे. यानिमित्ताने सर्वांनाच आत्मचिंतनाची वेळ आल्याचे ते म्हणाले. कोपर्डीची घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाज एकत्र येत असून, लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. काही मुद्दे वादाचे आहेत. त्यावर नेत्यांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा निश्‍चित केली जाईल. त्यानंतर प्रशासनासोबत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.