Breaking News

हिंमत जाधव हत्याप्रकरणी तिघांना अटक



। आरोपींमध्ये सोनई, शिर्डीच्या तिघांसह औरंगाबादच्या एकाचा समावेश । 20 पर्यंत पोलिस कोठडी 

 अहमदनगर (प्रतिनिधी) । 17 - राहुरी तालुक्यातील पिंप्री वळण येथील चंद्रकांत उर्फ हिंमत अभिमन्यु जाधव (वय 26) याच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नेवासा येथून सोमनाथ मोरे (शिंगणापूर), शिर्डी येथून अजिनाथ ठोंबरे, व कृष्णा कोरडे या संशयीतांसह जामगाव मधील एकास औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता 20 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पकडलेल्या आरोपींकडून महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यांनी खुन केल्याची कबुली दिली असून जाधव याचा सुपारी देऊन खुन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गुन्हे अन्वेशण शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, सपोनि. राहुलकुमार पवार, फौजदार इंगोले व सोने उपस्थित होते.
अधिक माहिती देतांना डॉ.सौरभ त्रिपाठी म्हणाले, मंगळवार दि. 13 सप्टेंबर रोजी इमामपूर घाटात दुपारी अडीच च्या सुमारास हिंमत जाधव यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा करतांना अनेक पुरावेजन्य वस्तु व माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. पवार, फौ.हिंगोले, हेकॉ.मधुकर शिंदे, योगेश गोसावी, मल्लिकार्जुन बनकर, दिंगबर कारखिले, दत्ता हिगडे, बाबासाहेब गरड, अण्णा पवार, उमेश खेडकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, जितेंद्र गायकवाड, योगेश सातपुते, सागर सुलाने, नामदेव जाधव, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, बाळासाहेब भोपळे, बबन बेरड, विठ्ठल मनिकेरी, शैलेश गोमसाळे यांच्या पथकाने तपास करुन सदर हत्येमागील गुढ अवघ्या 24 तासात उघड करुन आरोपी जेरबंद केले.
तपास सुरु असतांना पथकाने औरंगाबाद महामार्गावरील काही हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेच तपासले. तपासणीतून एका प्रत्यक्षदर्शीने आरोपीची माहिती दिली. घटनेची चौकशी करिता दुचाकीवरील तिघे संशयीत पोलिसांच्या रडारवर आले. त्यातील दुचाकी चालविणारा आरोपी सोनई येथील असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानुसार शिंगणापूर येथून सोमनाथ मोरे यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देऊन इतर आरोपीची नावे सांगितली. ताब्यात घेतलेला आरोपी सोमनाथ मोरे हा वाहन चालवित असल्याची माहिती पुढे आली. पकडलेल्या आरोपींचा मयत हिंमत जाधव यांच्याशी कोणताही संबंध नसून केवळ सुपारी घेऊन हत्या केल्याचे उडकीस आले आहे. या व्यतिरिक्त तीन आरोपी पोलिसांच्या लिस्टवर असून लवकरच या प्रकाराचे सत्य परिस्थीती समोर येईल असे पोलिस अधिक्षक यांनी सांगितले.