सुरक्षा रक्षकांना कुशल कामगारांचा दर्जा ! बंडारू दत्तात्रेय
नवी दिल्ली : सुरक्षा रक्षकांना आता कुशल कामगारांचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी केली. सुरक्षा रक्षकांना अकुशल ऐवजी कुशल कामगारांचा दर्जा तर बंदुकधारी तसेच निरीक्षकांना सर्वाधिक अकुशल कामगारांचा दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे कुशल कामगारांच्या वेतनात 40 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सुरक्षा रक्षकांना कुशल आणि अत्याधिक कुशल श्रेणीमध्ये समाविष्ट करून घेणे महत्वाचे आहे. यामुळे त्यांना त्यांच्या कामानुसार वेतन मिळेल. तसेच सुरक्षा रक्षकांचे किमान वेतन 15 हजार रुपये प्रती महिना आणि सर्वाधिक कुशल कामगारांचे किमान वेतन 25 हजार रुपये प्रती महिना करण्याचा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 50 लाख सुरक्षा रक्षकांना याचा फायदा होणार आहे. सर्व राज्यातील मजुरी ही समान राहावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी कायद्यात बदल करण्यात येणार आहे. पोलिसांना अनेक जबाबदार्या पार पाडाव्या लागतात, यामुळे त्यांच्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षकांची त्यांना मदत होते. सुरक्षा रक्षकांची भूमिका महत्वाची असून त्यांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
