सोनहिरा तर्फे शेती उद्योग उभारणार ः डॉ. कदम
कडेगांव, दि. 29 - सोनहिरा कारखान्याची गाळप क्षमता आता प्रतिदिन 7 हजार टन केली आहे. तसेच शेतकर्यांच्या ऊसाला दरही चांगला दिला आहे. त्याचबरोबर 22 मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प उभारला असून तो पूर्ण क्षमतेने सुरु आहे. तसेच कारखान्याच्या माध्यमातून अजूनही शेतीपूरक उद्योग उभारले जाणार आहेत, अशी माहिती आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी दिली.तालुक्यातील सोनकिरे व अंबक येथे अंतर्गंत रस्ते काँक्रिटीकरण तसेच गटार बांधकाम आदी कामाचा भूमिपूजन समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, जिल्हा परिषद सदस्य शांताराम कदम, उपस्थित होते. कदम म्हणाले, गेल्या पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत दुष्काळी भागाचा विकास करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न केले. सोनहिरा खोर्यासह घाटमाथ्यावरील सर्व भाग कायम दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. येथे सिंचन योजनांचे पाणी आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन भरघोस निधी आणला. निधीतून योजना कार्यान्वित झाल्या. त्यामुळे उजाड माळरानावर नंदनवन फुलले आहे. सोनहिराचे संचालक बापूसाहेब पाटील यांनी स्वागत केले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती आकांक्षा तांबेवाघ, उपसभापती सखाराम सूर्यवंशी, निवृत्ती जगदाळे, आनंदराव पाटील, पांडुरंग पाटील, सरपंच सचिन पाटील, अंबक सरपंच शैलजा जगदाळे, सुनील जगदाळे, भगवान जगदाळे, एन.एम. जगदाळे उपस्थित होते.