Breaking News

कोयना धरणाची यशोगाथा सांगणारा ’कोयना स्टोरी’ लघुपट प्रसारीत

कोयनानगर, दि. 17 (प्रतिनिधी) : तांत्रिक अभियांत्रिकेचे उत्तम शिल्प आणि महाराष्ट्राची शान असे गौरवपात्र असणार्या कोयना धरणाची यशोगाथा सांगणारा लघुपट तयार झाला आहे. गुणवत्ता व दर्जा असे दुसरे नाव म्हणून हा लघुपट अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याना अभ्यासासाठी प्रेरणा देणारा आहे. अभियंता दिनानिमित्त हा लघुपट प्रसारीत झाला आहे.
महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखला जाणार्या कोयना धरणाच्या निर्मितीचा लघुपट आजपर्यंत कधी तयार व प्रसारीत झाला नव्हता. ’कोयना स्टोरी’ नावाचा हा लघुपट फिल्म डिव्हीजनने निर्मित केला असून या लघुपटाचे दिग्दर्शन दिलीप जामदार यांनी केले आहे. सध्या हा चित्रपट फेसबुक, व्हॉटस्अप या सोशल मिडीयावर प्रसारीत झाला आहे. केवळ तीन दिवसात तो सव्वालाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून सात हजार ठिकाणी शेअर केला आहे. या लघुपटाची कथा एलिझाबेथ रूपेन यांनी लिहिली असून एस. टी. बेकर्ले यांनी आपल्या आवाजात कोयनेची कथा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.
एका पोवाड्याच्या माध्यमातून कशाप्रकारे कोयना धरणाची पाया भरणी झाली आणि सर्व कामगार व अभियंत्यांनी मिळून हा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण केला. याची प्रेरणादायी कथा या लघुपटात चित्रित करण्यात आली आहे. कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. 1956 ते 1962 या काळात राज्यातील जनतेला तिमीराकडून तेजाकडे नेण्यासाठी या धरणाची उभारणी करण्यात आली आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 105,25 अब्ज घनफूट करण्यात आली आहे.
रबर काँक्रीट या प्रकारात बांधण्यात आलेल्या धरणाची उंची 1032 मीटर, लांबी 807,72 मीटर, पाणीसाठयाची क्षमता 2794.4 दशलक्ष घनमीटर असून वापरण्या योग्य क्षमता 2677,6 दशलक्ष घनमीटर आहे. वीज निर्मिती व सिंचन अशा महत्वपूर्ण दोन्ही गरजा यशस्वीपणे भागवून राज्याला स्वयंपूर्ण बनवणारा प्रकल्प म्हणून कोयना प्रकल्पाकडे पाहिले जाते.
या लघुपटाच्या माध्यमातून अभियंता दिनाला कोयनेत अभियंत्यांनी केलेले काम सर्वांच्या स्मरणात राहण्यासाठी हा लघुपट मदत करेल.