Breaking News

बंदीजनांनी समाजोयोगी कामे करावीत : मुद्गल

सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) : कारागृह हे सुधारगृह आहे. बंदीजनांनी कारागृहात चांगल्या गोष्टींचा विचार करुन समजोपयोगी कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी केले. 
जिल्हा कारागृहात डेक्कन सोसायटीच्यावतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन अश्‍विन मुद्गल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक नारायण चौंधे, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. उदयसिंह पाटील, डॉ. जीवन लाहोटी, डॉ. शशिकांत पवार, वरिष्ठ तुरुंग अधिकारी एम. के. अवघडे, तुरुंग अधिकारी एन. बी. गवळी उपस्थित होते.
आरोग्य शिबीरामुळे न्यायालयीन बंदींचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल व ते समाधानी राहतील, असे सांगून मुद्गल म्हणाले, काविळ हा आजार गंभीर स्वरुपाचा असून त्यामध्ये अ, ब, क, ड असे प्रकार आहेत. काविळ होण्याचे वेगवेगळी कारणे आहेत, काविळ हा आजार शरिराची प्रक्रिया हळू हळू बंद पाडतो व रुग्णाचा मृत्यू होतो.
न्यायालयीन बंदींना वेळोवेळी औषधोपचारांची गरज असते. अशा आरोग्य शिबीराच्या माध्यमातून जिल्हा कारागृह प्रशासनावरील ताण निश्‍चितच कमी होईल. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करुन जाग्यावर औषधोपचार केले जाणार आहेत. बंदीजनांनी आपल्यामध्ये आरोग्याच्या सवयी निर्माण केल्या पाहिजेत. रोज योगासने, प्राणायाम करुन डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांचा, आहाराचा व आचरणांचा विचार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. उदयसिंह पाटील यांनी काविळ या रोगाविषयी माहिती देऊन काविळ रोगावर करण्यात येणार्‍या उपचारांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन एन. बी. गवळी यांनी केले. या आरोग्य शिबीरात न्यायालयीन सर्व बंदींची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका, कारागृहातील अधिकारी, कर्मचारी  बंदीजन उपस्थित होते.