Breaking News

नगरपालिकांसह नगरपंचायती हागणदारी मुक्त करा : मुद्गल

सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायती या 2 ऑक्टोबर 2017 अखेर हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी केले आहे. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांपाठोपाठ जिल्हाधिकार्‍यांनीही उघड्यावर प्रात:कालचे विधी करणार्‍यांवर कारवाई करण्याचे बैठकित आदेश दिल्याने आता या योजनेला आणखी गती येणार आहे. 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वच्छ भारत मिशनच्या राज्य अभियानाचे संचालक उदय टेकाळे, नगरपरिषद प्रशासनाचे जिल्हा प्रशासन अधिकारी किरणराज यादव, सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
मुद्गल म्हणाले, येत्या 2 ऑक्टोबर 2017 अखेर संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचे उद्दीष्ट असून आजअखेर कोरेगाव, लोणंद, पाटण, मेढा, खंडाळा, वडूज व दहिवडी शहरात सार्वजनिक शौचालयाचा वापर करणारी 3 हजार 485 कुटूंबे असून उघड्यावर शौचास जाणार्‍या कुटूंबांची संख्या 1 हजार 51 आहे. सर्व नगरपंचायती 2 ऑक्टोबर 2017 अखेर हागणदारीमुक्त कराव्यात. 9 नगरपालिकांपैकी 6 नगरपालिका या हागणदारी मुक्तझाल्या असून म्हसवड, फलटण व कराड नगरपालिकांनी 31 डिसेंबर 2016 अखेर हागणदारीमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. शासन वैयक्तिक शौचालय बांधण्यास 12 हजार अनुदान उपलब्ध करुन देते. याचबरोबर नगरपालिकांच्या स्वनिधीतून 5 हजार अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. 14 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाल्यास आणखी 5 हजाराचे अनुदान वैयक्तिक शौचालय बांधण्यास उपलब्ध होणार आहे. मोठ्या बाजाराच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच 2011 च्या जनगणनेवर आधारित उघड्यावर शौचास जाणार्‍या कुटूंबांचे सर्वेक्षण करावे. नवनिर्मित नगरपंचायतींनी डपिंग ग्राऊंडऐवजी घनकचरा निर्मुलन व्यवस्थापनासाठी जागेचा शोध घेऊन आराखडा सादर करावा, असेही ते शेवटी म्हणाले.