Breaking News

युवतीची अजिंक्यतारा किल्ला परिसरात आत्महत्या

सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) : शाहूपुरी येथील आझादनगरमध्ये राहणार्‍या शिवानी दीपक कडव (वय 19) या युवतीने अजिंक्यतारा किल्ला परिसरातील दरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली.
सातारा शहराच्या शाहूपुरी या उपनगरातील आझाद नगरमध्ये शिवानी कडव ही युवती कुटुंबियांसमवेत राहत होती. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात ती शिकत होती. तिचा घरातील लोकांच्या सोबत किरकोळ वादावादी झाल्यानंतर कॉलेज आणि क्लासला जाते असे सांगून ती निघून गेली. सकाळी गेलेली शिवानी सायंकाळपर्यंत न परतल्याने कुटुंबियांनी तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. याबाबत शिवानीचे वडील दीपक कडव यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली हेाती.
अजिंक्यतारा किल्ला परिसरातील दत्त मंदिराजवळ एक सॅक काही जणांना आढळली. त्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये पुस्तके व इतर साहित्य आढळून आले. यानंतर काही जणांनी शोध घेतला असता लगतच्या खोल दरीत एक मृतदेह निदर्शनास आला. या घटनेची माहिती लोकांनी पोलिसांना दिली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु असताना शिवानी हिच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार भोसले अधिक तपास करत आहेत.