उपअधिक्षकांसह 65 पोलिसांनी सिनेस्टाईल चोरटे पकडले
। दोघा आरोपींकडून 12 गुन्ह्याची कबुली । आरोपी मुंबई परिसरातील । स्टेशन रोड परिसरातील दुकान फोडीतील माल जप्त
अहमदनगर (प्रतिनिधी) । 28 - नगर- पुणे रस्त्यावरील शिल्पा अपार्टमेंटमधील सुधीर जयसुखलाल मुथ्था यांच्या अपोलो टायर विक्रीचे दुकान फोडुन दुकानातील टायर व रोखरक्कम चोरुन नेणार्या आरोपींना उपअधिक्षकांसह 65 कर्मचार्यांनी चास परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले. पकडलेल्या आरोपींनी तब्बल वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या 12 गुन्ह्याची कबुली दिली असून स्टेशन रस्त्यावरील दुकानातून चोरलेला माल काढून दिला. आरोपींकडून अनेक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. दोघाजणांना न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.सिनेस्टाईल आरोपींचा पाठलाग करत असतांना अंधाराचा फायदा घेऊन इतर तिघे आरोपी फरार झाले. पोलिस मिळालेल्या माहितीवरुन आरोपींच्या शोधासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. ही कारवाई पहाटेच्या सुमारास तब्बल तीन तास सुरु होती. बाजरीचे शेत पोलिसांनी पिंजून काढले. पहाटेच्या सुमारास पोलिस शेतात फिरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. या चर्चेतूनच आरोपी एका हॉटेलमध्ये पाण्याची बाटली घेण्यासाठी आले असता, एका चाणाक्ष नागरिकाने पोलिसांना माहिती दिल्याने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई उपअधिक्षक भोईटे, पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पथकाने केली. मात्र, आरोपी असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांनीच पोलिस अधिक्षक यांना दिली होती. त्यानुसारच सुवर्णज्योत परिसर पोलिसांनी पिंजून काढला होता.
नगर-पुणे रोडवरील अपोले टायरचे दुकान फोडून चोरलेला माल आरोपीकडून एक कार व चोरलेले 12 टायर हस्तगत करण्यात आले. फरहान मुमताज शेख (वय 28, रा. साकीनाका, मुंबई), मोहम्मद परवेझ तरवेझ दाऊद शेख (वय 37, रा. चव्हाण चाळ, कुर्ला रस्ता, अंधेरी ईस्ट, मुंबई) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, नगर-पुणे रस्त्यावरील शिल्पा अपार्टमेंटमधील गाळा नंबर 17 ते 20 अशा चार गाळ्यांत अपोलो टायर विक्रीचे दुकान आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास दुकानाचे मालक सुधीर जयसुखलाल मुथा यांना शिल्पा अपार्टमेंटमध्ये राहणार्या गौरव मुथा यांनी फोन केला. ‘तुमच्या दुकानाच्या शटरचा आवाज येत आहे. चोरी होत आहे, त्यामुळे लवकर या’, असा निरोप दिला. त्यानंतर सुधीर मुथा हे त्यांचा मुलगा करण यांच्यासह दुकानासमोर आले. त्यावेळी गौरव मुथा तेथे उभे होते. त्यांनी सुधीर यांना चोरट्यांनी शटर उचकटल्याचे सांगितले. त्यानंतर मुथा यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता आतील अपोलो कंपनीचे 45 हजार 100 रुपयांचे 12 टायर चोरीस गेल्याचे लक्षात आले.
गौरव मुथा यांनी चोरट्यांची कार पाहिली होती. त्यांनी एमएच 42-5 असा अर्धवट क्रमांक सांगितला. सुधीर मुथा यांनी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून तपासाची चक्रे वेगात फिरविण्यात आली. सुरुवातीला कार पुण्याच्या दिशेने गेली होती. परंतु, चोरी झाली त्यावेळी कायनेटीक चौक परिसरात नाकाबंदी सुरू असल्याने चोरट्यांनी दुसर्या रस्त्याने कार वळविली. पाटील यांच्या पथकाने चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. तसेच वायरलेसवरून सर्वत्र संदेश पाठविला. त्यावेळी इतर पोलिसही माहिती मिळालेल्या कारचा शोध घेत होते. नगर तालुका पोलिसांचे पथक पुणे रस्त्यावर गस्त घालित होते. त्यांना हॉटेल सुवर्णज्योतजवळील एका दुकानाजवळ चोरटे कारचा टायर बदलताना दिसले. पोलिसांची गाडी जवळ येताच चोरटे कार जागेवरच ठेवून अंधारातून पळाले. कार व चोरलेले टायर पोलिसांनी ताब्यात घेतले. वायरलेस संदेश मिळताच तेथे काही वेळातच पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे व सहाय्यक निरीक्षक पाटील यांची पथके दाखल झाली. त्यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. आरसीपीच्या एका पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
65 पोलिसांच्या संयुक्त पथकांनी अंधारात चोरट्यांची शोधमोहीम सुरू केली. परंतु, बराच वेळ कोणी हाती लागले नाही. सकाळच्या सुमारास आरोपी पाण्याची बाटली घेण्यासाठी तीन जण हॉटेलात आले. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेतली. पोलिस आल्याचे समजताच चोरटे तेथूनही पळाले. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला. एका बाजरीच्या शेतातून दोघांना पकडले, तर इतर काही साथीदार पसार झाले. चोरी झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आले. दरम्यान या प्रकरणी सुधीर मुथा यांनी कोतवालीत फिर्याद दिली असून आरोपींविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुथा यांनी जप्त केलेला माल ओळखला असून मालाची सर्व कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केली आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड हे करीत आहेत.