Breaking News

उमदी आत्महत्त्याप्रकरणी पो. अधिकार्‍यासह तिघांवर वॉरंट

सांगली, दि. 24 - चंद्रशेखर नंदगोड या तरुणाने पोलिस ठाण्याच्या आवारातच आत्महत्त्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच फरार झालेले उमदी (ता. जत) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश वाघमोडे, उपनिरिक्षक राजाराम चिंचोळेकर व हवालदार प्रमोद रोडे या तिघांविरुद्ध जत न्यायालयाने पकड वॉरंट बजावले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तिघेही फरार आहेत. महिन्याभरात ते सापडले नाहीत, तर त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सीआयडीकडून सुरु केली जाणार आहे.
उमदीत दोन महिन्यांपूर्वी एका महिलेचा खून झाला होता. याप्रकरणी उमदी पोलिसांनी चंद्रशेखर नंदगोड यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 6 जूनला त्याने पोलिस ठाण्यातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी केली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सांगलीच्या सीआयडी विभागाकडे सोपविली. सीआयडीच्या चौकशीत पोलिसांच्या मारहाणीला घाबरुन नंदगौड याने आत्महत्त्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार वाघमोडे, चिंचोळेकर या दोन अधिकार्‍यांसह हवालदार रोडे यांच्याविरुद्ध नंदगोडला डांबून ठेवणे, मारहाण करणे व आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच या तिघांनी अटकेच्या भीतीने पलायन केले. सांगली, कोल्हापूर सातारा येथील सीआयडीचे पथक संयुक्तपणे तिघांचा शोध घेत आहेत. त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील घरांवरही छापे टाकले आहेत.
तिघांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला.  त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथेही जामीन फेटाळण्यात आला. ते शरण येतील, अशी सीआयडीला अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे सीआयडीने जत येथील न्यायालयात ते सापडत नसल्याचा अहवाल सादर केला. यावर न्यायालयाने या तिघांचे पकडवॉरंट जारी केले आहेत. महिन्याभरात ते सापडले नाहीत, तर त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.