Breaking News

गतीरोधकामुळे दुचाकीवरून घसरून पडल्यामुळे तरुणीचा मृत्यू

पुणे, दि. 01- एका तरुणीचा नाना पेठ येथील गतीरोधकामुळे दुचाकीवरून घसरून पडून, वीजेच्या खांबावर डोके आपटल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (शनिवारी) सकाळी घडली. नयना गुरूमुख नारंग (वय - 28), असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती दौंड नगरपालिकेचे नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गुरूमुख नारंग व माजी उपनगराध्यक्षा कविता नारंग यांची धाकटी कन्या होती.  अवयवदानाच्या प्रचार कामात सहभागी नयनाच्या शवविच्छेदनापूर्वी तिचे नेत्रदान करण्यात आले.
नयना ही जवाहरलाल नेहरू रस्त्यावरून संत कबीर चौकाकडून शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज हॉटेलच्या दिशेने चालली होती. शनिवारी सकाळी तिची दुचाकी गतिरोधकावरून घसरली. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विजेच्या लोखंडी खांबावर तिचे डोके आपटले. डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. रतन रमेश अंकम (रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिसांना अपघाताबाबत माहिती दिली. रतन यांनी नयनाला केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नयना हिने दौंड शहरातील सेंट सेबॅस्टियन विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर नयना हिने सूक्ष्मजीवशास्त्रात पद्व्यूत्तर पद्वी संपादित केली होती.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या ती जैव तंत्रज्ञानांतर्गत टाकाऊ पदार्थांवर संशोधन करीत होती व त्यासाठी तिला राज्यपातळीवरील पुरस्कार मिळाला होता. अवयवदानाचा प्रचार व प्रसार कार्यात ती सहभागी होती. दौंड शहरातील भीमा नदीतीराजवळ शनिवारी सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.