Breaking News

आयुष्यात किमान प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवावे

।  जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांचे प्रतिपादन । बाजार समिती आवारात वृक्षारोपण 

अहमदनगर, दि. 03 - राज्य सरकारने राज्यभरात सुमारे 2 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पानुसार अनेकजण या चळवळीत सहभागी झाले आहेत. आज मोठ्या संख्येने सर्वच ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिणामामुळे प्रत्येकजण जागृत होत असून, झाडे लावण्याचा प्रयत्न करीत आहे. आयुष्यात किमान प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवल्यास भविष्यातील अनेक संकटे आपोआपच दूर होतील, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांनी केले.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने श्री. दाबशेडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभापती हरिभाऊ कर्डिले, तालुका उपनिबंधक कुलकर्णी, संचालक दिलीप भालसिंग, बाजीराव हजारे, संतोष कुलट, अंबादास बेरड, जयवंत शिंदे, राज्य बाजार समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप डेबरे, सचिव अभय भिसे, भोर आदी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले की, राज्य शासनाने राबविलेल्या वृक्षारोपण मोहिमेत प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे. त्याशिवाय हा उपक्रम यशस्वी होणार नाही. बाजार समितीच्या सुमारे 300 झाडे लावण्यात येणार आहेत, तर नेप्ती उपबाजार समितीत सुमारे 500 झाडे लावण्यात येणार आहेत. ही सर्व झाडे जगविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. झाडे असतील, तर आपले जीवन अधिक आनंदी होईल, असे ते म्हणाले.