Breaking News

भाजीपाला विक्रेत्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

कुकाणा ( प्रतिनिधी ) - नेवासा तालुक्यातील तरवडी येथील भाजीपाला विक्रेत्याचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत उत्तीर्ण झाला आहे. तरवडी येथील मुरलीधर ढाकणे यांनी नेवासा - शेवगाव तालुक्यातील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपल्या मुलांना शिक्षणाबरोबरच सुसंस्कार देऊन मुलाचे पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार करून आपले कर्तव्य पार पडले. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणारा अभय मुरलीधर ढाकणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्याबद्दल तरवडी येथे ढाकणे यांची ग्रामस्थांनी येथील काशिविश्वेश्वर मंदिरापासून सवाद्य मिरवणूक काढून मारुती मंदिर सभागृहात सत्कार समारंभांचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अँड. देसाई देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पांडुरंग अभंग , जिल्हा शिवसेना नेते व ज्ञानेश्वरचे संचालक रामदास गोल्हार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिनकरराव गर्जे, रामनाथ महाराज राजगुरू, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील समितीचे सचिव उत्तमराव पाटील, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, रंगनाथ महाराज ढाकणे, मुरलीधर ढाकणे, बाबासाहेब ढाकणे, इंजिनिअर निर्णय ढाकणे, जनादेवा भालेराव, अभिजित लुनिया, भाऊराव घुले, अर्जुन पंडित आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापक दत्तात्रय गवळी यांनी केले. यावेळी माजी आमदार व ज्ञानेश्वर चे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, तरवडी या गावाला दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या रूपाने समाजसेवेचा वारसा लाभलेला असुन संस्कार व शिक्षणाशिवाय कोणतीही पदवी मिळत नाही, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. माणसाला कोणत्याही पदापर्यंत जाण्यासाठी जिद्द, स्वकर्तुत्व व शरीर संपदा असणे महत्त्वाचे आहे. अभय ढाकणे यांनी पोलिस उपनिरीक्षक होण्याचा निश्चिय करून त्या पदापर्यंत पोहचल्याने ते निश्चितच निश्चयाचे महामेरू ठरले आहेत. तर अँड. देसाई देशमुख म्हणाले की, ढाकणे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड म्हणजे तरवडी गावाबरोबरच नेवासा तालुक्याला भुषणावह आहे. या स्पर्धेच्या युगात युवकांनी विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आपला वेगळा ठसा उमठावा व उच्च पदावर जाऊन या गावचे भूषण असलेले दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे स्वप्न साकार करावे. यावेळी सत्कार मुर्ती पोलिस उपनिरीक्षक अभय, रामनाथ महाराज राजगुरू, दिनकरराव गर्जे, रामदास गोल्हार, प्रा.संजय दरवडे,यशवंत पाटील यांची भाषणे झाली. या निवडीबद्दल अभय ढाकणे यांचा श्री.संत सेना महाराज ग्रुप व युवक बचत गटाच्या वतीने महाराष्ट्र नाभिक महामंडळ युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार सुनिल पंडित व अर्जुन पंडित यांनी सत्कार केला. तसेच दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती, विविध संस्था व मित्र मंडळाच्या वतीने फेटा, शाल,पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शिरीष देशपांडे यांनी केले तर माजी सरपंच आत्माराम दरवडे यांनी आभार मानले.