Breaking News

रिपब्लिकन सेना;आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्र्यांचे वाहन अडवले

अहमदनगर (प्रतिनिधी)। 03 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंबुईच्या दादर येथे असलेले ऐतिहासिक आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटीग प्रेस पाडण्याचा निषेध करताना रिपब्लिकन सेनेच्या कार्यकत्यांनी आक्रमक होत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे वाहन अडवले. ना.शिंदे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आणि सरकारसमोर बाजू मांडणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कार्यकर्ते वाहनांसमोर बाजूला हटले. यावेळी पोलिसांचे तारांबळ उडाली.
(कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने कृषी दिनाचे आयोजन केले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजित कार्यक्रमासाठी ना. शिंदे आले होते. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत जमले. आंबडेकर भवन पाडणार्‍यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करा अशा मागणी करू लागले. घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसर दणाणला होता.
कार्यकर्ते प्रवेशद्वाराजवळ घोषणा देत असतानाच पालकमंत्र्यांचा ताफा तेथे आला. पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोरील वाहनांतून पोलिसांनी उतरून कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळून बाजूला केले. पोलिसांचे वाहन पुढे सरकताच पालकमंत्र्यांच्या वाहनासमोर सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या. या प्रकारामुळे पोलिसांची चांगली धावपळ झाली. कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या वाहनासमोरच घोषणाबाजीला सुरूवात केली.
ना.शिंदे यांनी वाहनाची काच खाली करत कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवेदन स्वीकारले. राज्य सरकारसमोर यासंदर्भात बाजू मांडू असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर वाहनांसमोरील कार्यकर्ते बाजूला झाले. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजू आढाव, जिल्हा कार्याध्यक्ष महादेव काळे, अशोक गायकवाड, कल्याण रंधवे, कुंदन तुपेरे, सुंदर जाधव, रोहिदास अडागळे आदी पदाधिकारी यावेळी घोषणाबाजी करत होते.