बळीराजा सुखावला !
मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कायम !
सतर्क सिस्टिमकडून हाय अलर्ट
मुंबई, दि. 03 - पावसाने मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये चांगलाच जोर धरला आहे. तसेच पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने धूम केली आहे. मुंबईत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्ते आणि रेल्वे वाहतू विस्कळीत झाली होती. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु असून, पुणे शहर व उपनगरात शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे.सतर्क सिस्टिमने हाय अलर्ट जाहीर केला असून नागरिकांनी शक्यतो घाट भागातून प्रवास करणे टाळावे असे आवाहन केले आहे.
जोरदार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेसह अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे लोणावळा, मालशेज आणि महाबळेश्वर यांसारख्या ठिकाणी सहलीकरिता जाणे नागरिकांनी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धो धो कोसळणार्या पावसाच्या धारांनी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसराला शनिवारी दिवसभर झोडपून काढले. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबई तुंबली. मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणे पाण्याखाली जाऊन मुंबईची तुंबई झाल्याने शहर व उपनगरातील नालेसफाईच्या कामाच्या दर्जावर आणि महापालिकेच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. हर्णे येथे सर्वाधिक 251 मिमी, पेडणे 220, दापोली 17, महाड, पेण 160, कणकवली, पनवेल, राजापूर येथे प्रत्येकी 150 मिमी पाऊस झाला. राज्यभर पावसाचा तडाखा सुरू असतांना अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात जून उलटला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही.

