पशूंच्या अवयवांची ऑनलाईन विक्री : दवे
नवी दिल्ली, दि. 20 - क्विकर, ओएलएक्स, ईबे, अॅमेझॉन, अलिबाबा आणि यु टयूब यासारख्या लोकप्रिय वेबसाईट्सवर दुर्मीळ वनसंपदा आणि पशूंच्या अवयवांची ऑनलाईन तस्करी होत आहे, असा आरोप सोमवारी पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांनी केला. या वेबसाईट्स आता सरकारच्या रडारवर आल्या आहेत. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार या पद्धतीच्या तस्करीवर नजर ठेवून आहे, असे त्यांनी सांगितले.राज्यसभेतील एका लेखी प्रश्नावर दवे यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले की, अनेक वेबसाईट्सवर दुर्मीळ पशू आणि त्याच्या अवयवांच्या विक्रीच्या जाहिराती केल्या जात आहेत. वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने जमा केलेल्या 100 वेबसाईट्सची यादीही त्यानी सादर केली.
या 106 वेबसाईट्समध्ये क्विकर, ओएलएक्स, अलिबाबा, ईबे,यु टयूब आणि अॅमेझॉन सेच रेडिफ, स्नॅपडील आदींचा समावेश आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांना रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली असून त्यात सायबर गुन्हे तज्ज्ञांचे सहाय्य कंत्राटी तत्त्वावर घेऊन नियमित सायबर पेट्रोलिंग करण्याचा समावेश आहे. त्याद्वारे अशा ऑफर्स आणि पोस्टस शोधून काढल्या जात आहेत.