Breaking News

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : नारायण राणे

मुंबई, दि. 20 - कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे तुकडे तुकडे करणा-या भयानक अशा अमानुष घटनेचे तीव्र पडसाद  विधानमंडळात मंगळवारी दोन्ही सभागृहात जोरदारपणे उमटले. राज्य चालवता न येणा-या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेत ज्येष्ठ नेते  नारायण राणे यांनी जोरदारपणे केली तर विधानसभेत विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केली.
विधान परिषदेत नारायण राणे यांच्या भाषणाने सभागृह दणाणून गेले. नारायण राणे यांचे भाषण ऐकण्याकरिता आमदार कक्ष आणि प्रेक्षक कक्ष तुडुंब भरलेला होता.  धनंजय मुंडे यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देऊन चर्चेची सुरुवात करताना नारायण राणे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील माय-भगिनींचे संरक्षण करता येत नसेल, सामान्य  माणसाला सुरक्षित वाटत नसेल तर गृहखाते तुम्ही ठेवता कशा करता? गृहखात्याचा अर्थ समजला आहे का? या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वातच  राहिलेली नाही.
जनतेचे संरक्षण तुम्हाला करता येत नाही, म्हणून मुख्यमंत्रीपदाचा आवाका नसलेले मुख्यमंत्रीपद सोडून राजीनामा देऊन मोकळे व्हा, अशा सणसणीत शब्दांत  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मंगळवारी विधान परिषदेत फडणवीस आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला.