Breaking News

रामदास आठवले यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने नाशिक शहरात जल्लोष

नाशिक/प्रतिनिधी। 7 - केंद्र सरकार मध्ये भारतीय जनता पार्टीने रामदास आठवले यांना दिलेला शब्द खरा करत मंत्री पद दिले त्याबद्दल भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नाशिक महानगरच्या वतीने शहर भर फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
    अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने तीन पुतळे, फुले नगर, पंचवटी, नाशिक येथे मोर्चाचे अध्यक्ष संजय गालफाडे, नाशिक रोड येथे मोर्चाचे मंडलअध्यक्ष किरण पगारे, सिडको मंडल येथे कुंदन खरे, मध्य नाशिक मंडल येथे राजू मोरे, द्वारका मंडल येथे मनोज मरसाळे यांचे नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला.
     याप्रसंगी तीन पुतळे फुले नगर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांना मंत्री पद देऊन भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातिल दलित जनतेला न्याय दिला आहे.
दलित चळवळीत काम करणार्या एका नेत्याला मंत्री पद देऊन वर्षानुवर्ष दलित समाजाची असलेली मागणी पूर्ण केलेली आहे. इंदु मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे उद्घाटन, लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या वास्तूचे स्मारकात रूपांतर करणे, जपान मधील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे झालेले अनावरण, केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणार्या विविध कल्याणकारी योजना आणि आत्ता रामदास आठवले यांना दिले गेलेले केंद्रीय मंत्री पद यामुळे भारतीय जनता पार्टी बद्दलचा असलेला विश्‍वास दलित समाजा मध्ये आणखी वाढेल व संपूर्ण दलित समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहील अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष संजय गालफाडे यांनी दिली.