Breaking News

लाल दिव्याची आशा; प्रसन्न होऊ दे ‘वर्षा’

जिल्ह्याला 9 जुलैच्या विस्ताराची प्रतिक्षा

कुमार कडलग/नाशिक। 7 - केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात नाशिक जिल्ह्याची घोर निराशा झाल्यानंतर आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना राज्य मंत्रीमंडळात सहभागी होण्याचे वेध लागले आहेत. दरम्यान 9 जुलै रोजी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या विस्तारात स्थान मिळावे म्हणून भाजपच्या आमदारांनी जबरदस्त लॉबींग सुरू केले आहे.
मनपा आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका अवघ्या 8 महिन्यांवर येऊन ठेपल्याने शतप्रतिशतचे स्वप्न पाहणार्‍या शहर जिल्हा भाजपाने मंत्रीपद मिळवून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षीय पातळीवर पदाधिकार्‍यांनी आपल्या समर्थक आमदारांची मंत्रीमंडळात वर्णी लावण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे रदबदली करीत असतांनाच स्वतः आमदार देखील पक्षातील गॉडफादरला प्रसन्न करून घेण्यासाठी झटत आहेत.
शहरात तिव्र स्पर्धा
शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. या तिनही आमदारांना लाल दिव्याच्या गाडीचे डोहाळे लागले असल्याने तिघांनीही मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
मंत्री होण्यासाठी
आपणच कसे पात्र आहोत हे सिध्द करण्यासाठी आमदार त्रयींमध्ये तिव्र स्पर्धा सुरू झाली आहे. एकाच पक्षाचे आमदार असूनही या तिघांमध्ये समन्वय नसल्याने शहर वासियांच्या पदरात उपेक्षाच पडली असतांना जनहितापेक्षा सत्तेच्या माध्यमातून स्वहित साधण्यात हे लोकप्रतिनिधी व्यस्त असलेले आता लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न पहात आहेत.
9 जुलै रोजी कुणाच्या नशिबात लाल दिवा आहे यावर चर्चा सुरू असली तरी या खेळात सिमा हिरे यांचे नाव मागे पडत असून बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदे यांच्या रस्सीखेच सुरू आहे.