Breaking News

1200 वृक्ष संगोपनाची घेतली ग्रामस्थांनी जबाबदारी

अमरापूर (प्रतिनिधी) । 07 - महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित कृषीदिन व कृषी सप्ताहानिमित्त शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे सुमारे 1250 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांच्या संगोपनाची व पालकत्वाची जबाबदारी ग्रामस्थ व सरकारी कर्मचारी यांनी घेतली आहे. या वृक्षांना ट्री गार्ड बसविणे, पाणी देणे व त्यांचे संवर्धन करण्यासाठी लागणारा खर्च ग्रामस्थ व सरकारी कर्मचारी लोकसहभागातून करणार असल्याची माहिती सरपंच विजयराव पोटफोडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी व ग्रामसेवक अण्णासाहेब नजन यांनी दिली. 
सामाजिक वनीकरणातर्फे अमरापूर ते शेवगाव रस्त्याच्या दुतर्फा आ. मोनिकाताई राजळे व जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे यांच्या हस्ते वृक्षलागवडीचा प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे पाटील, कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भोसले, सरपंच विजयराव पोटफोडे, बाळासाहेब ताठे, कृषी अधिकारी व्ही. एन. बडे आदींच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली. यामध्ये वड, पिंपळ, लिंब, चिंच, करंज, शिसव, काशीद, बेल, जांभळ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली.अमरापूर ते फलकेवाडी रस्त्यापर्यंत सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. अमरापूर हायस्कूल येथेही सुमारे जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे, धर्मादाय आयुक्त व्ही. के. शेळके, काकडे विद्यालयाचे माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्राचार्य व्ही. के. मरकड आदींच्या हस्ते सुमारे 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. अमरापूर येथील महादेव मंदिर ते नगर रोड रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थ व सरकारी कर्मचार्‍यांच्या मदतीने दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली. या वेळी तलाठी अमोल कचरे, ग्रामसेवक अण्णासाहेब नजन, सेवा संस्थेचे सचिव हरिभाऊ शिदोरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सुसे, काकासाहेब म्हस्के, नामदेव भूकन, बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच बाबासाहेब पोटफोडे, प्रदीप बोरुडे, हरिभाऊ महाजन, महेश लहाडणो, सुभाष अडसरे, गणोश गरड, सोमनाथ सुसे, शरद खैरे, दत्तात्रय खैरे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत श्रीमती एल. के. राऊत, श्रीम. शिरसाट एम. ए., श्रीम. घुले पी. आर., श्रीम. आर. आर. गांगुर्डे, श्रीम. एस. आर. देशमुख, एस. बी. धनवडे, श्रीम. जी. बी. आहेर आदींसह शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी वृक्षलागवड केली.