Breaking News

नोवाक जोकोविच विम्बल्डनमधून बाहेर

लंडन, दि. 02 - जागतिक टेनिसमध्ये नंबर 1 खेळाडू नोवाक जोकोविचला विम्बल्डनमध्ये तिसर्‍या फेरीतच सॅम क्वेरीकडून पराभवाच धक्का सहन करावा लागला. या पराभवामुळे सर्बियाच्या या खेळाडूचे 47 वर्षांत कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याच्या आशेला तडा दिला.
जोकोविच 2009 फ्रेंच ओपननंतर एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत लवकर पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. काल पावसामुळे सामना थांबल्यामुळे आजदेखील दोन तास उशिरा झालेल्या सामन्यानंतर अमेरिकेच्या क्वेरीने जोकोविचवर 7-6, 6-1, 3-6, 7-6 असा विजय मिळवला. या पराभवामुळे जोकोविचचे ओपन युगात ग्रँडस्लॅममध्ये विक्रमी सलग 30 विजयाची मालिकादेखील खंडित झाली आणि त्याचबरोबर तो सलग 29 व्या ग्रँडस्लॅम उपांत्यपूर्व फेरी गाठण्यापासूनही वंचित राहिला. जगातील 41 व्या क्रमांकावरील खेळाडू आणि 28 व्या मानांकित क्वेरीला उपांत्यपूर्व फेरीत आता फ्रान्सच्या निकोलस माहुत याच्याशी दोन हात करावे लागतील.