राज्यात पावसाची काही ठिकाणी हुलकावणी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातर्यात मुसळधार; मराठवाड्यात तुरळक
पुणे - 03 - राज्यात मॉन्सूनच्या पाऊसाची कुठे हजेरी तर कुठे दांडी अशी परिस्थिती असून काही जिल्ह्यात अद्यापही चिंतेचे वातावरण असून बळीराजा चिंतेत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार आहे. अन्य भागांत मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला 104 मिलिमीटर झाला आहे. सातारा जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 226 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला 104 मिलिमीटर नोंद झाली आहे. कोयनेसह सर्वच धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. कोयना धरणांत एक टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.
कोल्हापूर - जिल्ह्यात रात्रभर पाऊस, दिवसभर पावसाळी वातावरण, हवेत गारवा; पण उघडीप, असेच चित्र पाहायला मिळत आहे. गगनबावडा 81 मिमी, शाहूवाडी 59 मिमी पावसाची नोंद झाली. अन्य तालुक्यांत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.
सांगली जिल्ह्यात पावसाची रिपरिप आजही कायम राहिली. शहरातही पावसाने दमदार हजेरी लावली. शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात पावसाचा जोर थोडा कमी झाला. वारणावती येथे 24 तासांत 63 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात 25 टक्के पाणीसाठा झाला आहे. वाकुर्डे-येळापूरदरम्यान असणार्या खिंडीतील दरड कोसळून दगड रस्त्यावर आले आहेत. यंदा जिल्ह्यात जून महिन्यात 112 मिलिमीटर पाऊस झाला. तो सरासरीच्या 125 टक्के आहे.
दरम्यान कोकण भागात दमदार पाऊस सुरू असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, आदि जिल्ह्यात दमदाद पाऊस सुरू आहे.
अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत 115.45 मिलिमीटरच्या सरासरीने पाऊस झाला.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत अवघा 19.74 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई अद्याप जाणवत आहे. जिल्ह्यात सर्वत्र दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे; पाऊस मात्र नाही. त्यातच शनिवारी दुपारपासून कोरडे वारे वाहू लागल्याने पाऊस लांबण्याचीच भीती व्यक्त होत आहे.