Breaking News

डिजिटल महाराष्ट्रसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे : ना. फडणवीस

महावितरणच्या चार नव्या मोबाईल अ‍ॅप्स्चे उध्दघाटन

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी)  : सेवा क्षेत्रात असलेल्या महावितरणने एक पाऊल पुढे जात ग्राहकसेवा व प्रशासकीय गतिमानतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मोबाईल अ‍ॅप्स्ची केलेली निर्मिती डिजिटल महाराष्ट्रसाठी पुरक असून यापुढे नागरिकांना शासकीय कार्यालयांत जाण्याची गरज भासणार नाही, अशा सर्व सेवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळाव्यात, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
महावितरणने ग्राहकांसाठी ’महावितरण’ हे अ‍ॅप आणि कर्मचार्‍यांसाठी ’नवीन कनेक्शन’, ’मीटर रीडिंग’ व ’कर्मचारी मित्र’ हे तीन अ‍ॅप्स् तयार केले आहेत. या चार नव्या स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप्स्चे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावार राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार उपस्थित होते.
ना. फडणवीस म्हणाले, राज्याच्या वीज क्षेत्रात सध्या तिन्ही कंपन्यांची चांगली कामगिरी सुरू आहे. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. महावितरणच्या चारही मोबाईल अ‍ॅप्स्मुळे वीजग्राहकांना सुलभतेने व तत्परतेने लोकाभिमुख सेवा मिळेल तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हातात मोबाईल अ‍ॅप्स्च्या माध्यमातून कार्यालयीन कामकाजाची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्राहकसेवा व प्रशासकीय सेवेत गतिमानता व पारदर्शकता येईल. वीज ग्राहकाला केंद्रस्थानी ठेऊन महावितरणने लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.
बावनकुळे म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवाक्षेत्राचे विस्तारीकरण करणे ही काळाची गरज आहे. महावितरणच्या नव्या चार मोबाईल अ‍ॅप्स्मुळे गुणवत्तापूर्ण ग्राहकसेवेसोबत प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता येईल. उत्कृष्ट ग्राहकसेवा देण्यासाठी सूचवलेल्या सुधारणांवर महावितरण प्रभावीपणे काम करत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात परळी, अदानी, कोयनामधील वीजनिर्मिती बंद झाली तरी खुल्या बाजारातून वीजखरेदी न करता कोणत्याही भागात विजेचे भारनियमन होऊ दिले नाही. पूर्वीच्या तुलनेत वीजक्षेत्राबाबत नागरिकांचा असंतोष कमी झाला आहे. आता त्यांची नाराजी किरकोळ प्रश्‍नांवरून आहे. हे प्रश्‍न दूर करणे सहज शक्य असून त्यादृष्टीने महावितरण प्रयत्न करत असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार म्हणाले, वीजग्राहक व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांच्यातील दरी दूर करण्याचा प्रयत्न मोबाईल अ‍ॅप्स्च्या माध्यमातून केला आहे. ग्राहक तक्रारींचे विश्‍लेषण, कर्मचार्‍यांशी चर्चा करून या चारही मोबाईल अ‍ॅप्स्ची निर्मिती केली आहे. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी यांनी मनोगत व्यक्त केले. महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रभाकर शिंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान) विजयकुमार गौतम, प्रधान सचिव (उद्योग) अपूर्वचंद्रा, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे सदस्य दीपक लाड, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल, तिन्ही वीज कंपन्यांचे संचालक, वरिष्ठ अधिकारी व विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.