Breaking News

बँकांनी शासकीय योजनांना प्राधान्य द्यावे : यादव

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील सर्व बँकांनी सर्वसामान्य लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी केले.
येथील नियोजन भवनात जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी यादव बोलत होते. बैठकीस रिझर्व्ह बँकेचे प्रबंधक हेमंत दंडवते, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे उपस्थित होते. प्रारंभी शिरोळकर यांनी सर्वांचे स्वागत केले तर थोरात यांनी प्रास्ताविकेत आढावा घेतला.
यादव म्हणाले, काही बँकांना कामकाजात सुधारणा करावी लागेल. सर्वसामान्य लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन यांच्या विविध योजनांना प्राधान्य द्यावे. बँकांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल करावी. पर्यायाने आपल्या देशाचा विकास होईल.