Breaking News

शेतकरी व सहकार बँकेचे नाते अतुट: राजळे

। शेतकरी कोणत्याही पक्षाचा असो त्याला न्याय देण्याचे काम केले : अशोकराव आठरे  

पाथर्डी (प्रतिनिधी) । 07 - शेतकरी व सहकार बँकेचे नाते अतुट आहे. अनेक नवीन धोरणांमुळे सहकाराचे सरकार झाले काय, असा प्रश्‍न सहकारातील जाणकारांना पडत आहे. सहकार टिकला पाहिजे नाहीतर शेतकरी अडचणीत येईल अशी भीती माजी आमदार राजीव राजळे यांनी व्यक्त केली आहे. येथील विठोबाराजे लॉन्समधे जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी अशोकराव आठरे, शाखाधिकारी मुरलीधर शेरकर व मधुकर साबळे,अरुण आहेर यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोज़ित सत्कार कार्यक्रमात राजळे बोलत होते. या वेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, शिवसनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, वृद्धेश्‍वरचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, सोमनाथ खेडकर, युवराज देवढे, चारुदत्त वाघ, शिवशंकर राजळे, बाळासाहेब गोल्हार,महादेव जायभाये, नगरसेविका मंगल कोकाटे,काशिबाई गोल्हार,मनीषा वायकर यांच्यसह विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक उपस्थित होते.
राजळे पुढे म्हणाले, अशोकराव आठरे यांनी सहकारात केलेले काम दीपस्तंभासारखे आहे. गेल्या दहा वर्षात शेतक-यांना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यामातून विम्याचा लाभ मिळण्यासाठी बँकेच्या सर्वच अधिकार्यांनी घेतलेले कष्ट महत्वाचे आहेत. आपल्या तालुक्यात कर्ज भरणारे शेतकरी आहेत.कर्जाची वसुली करण्याचे काम सचिव व बँकेचे अधिकारी करीत असतात. सहकारी बँकेची वसुली 90 टक्के आहे. यामधे त्यांचा वाटाही मोठा आहे. प्रत्येक यशस्वी माणसाला त्यांच्या धर्मपत्नीची साथ महत्वाची असते.किंबहुना यशवंतराव चव्हाण व महात्मा गांधी यांच्या मोठेपणात त्यांच्या पत्नींचे योगदान महत्वाचे असल्याचे उदाहरण आहे. आपणही आपल्या पत्नीच्या सहकार्यामुळे चांगले काम करूशकतो. सहकारात अनेक नवीन पांयडे येत आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत. सचिवावरील देखरे.ख संघाचे नियंत्रण गेले आणि वाईट अवस्था होताना पहावयाला मिळत आहे. अशोकराव आठरे यांनी सहकारी बँकेत आलेला शेतकरी कोणत्याही पक्षाचा असो, त्याला न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांनी नवृत्तीनंतर राजकारणात पडू नये. सहकारी क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांना भरपूर संधी आहे. या वेळी सत्काराला उत्तर देताना अशोकराव आठरे म्हणाले, मी सेवेतून नवृत्त होत असल्याचे दु:ख जरूर आहे. पण मी केलेल्या कामाची पावती मला मिळाली आहे. माझे नेते (राजीव राजळे) माझ्या सेवा पूर्तीच्या सत्कार कार्यक्रमातून तालुक्याच्या राजकारणात पुन्हा नव्या दमाने सक्रिय होत आहेत. राजळे यांना पाहून कार्यकर्त्यामधे चैतन्य पसरले आहे, ही सुखाची बाब आहे. बाळासाहेब अकोलकर यांनी प्रास्ताविक केले. भालचंद्र तांभोरे व राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले.  पंढरपूरच्या विठोबाला मी साकडे घालतो की, यावर्षी चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी होऊ दे, शेतकर्‍यांना लक्ष्मी मिळू दे आणि सहकारी बँकेची चांगली वसुली होऊ दे, असे राजीव राजळे यांनी सांगितले.