भूमीच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वांची : तनपुरे महाराज
करंजी (प्रतिनिधी) । 07 - आपल्या मातृभूमीला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी तिला वृक्षारोपणातून हिरवा शालू परिधान करा, असे आवाहन राष्ट्रीयसंत बद्रिनाथ महाराज तनपुरे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथे तनपुरे बाबा विद्यालयात शिक्षण विभागाचे उपसंचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून तनपुरे महाराज बोलत होते. तनपुरे बाबा शिक्षण संस्थेने ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी बी.सी.ए. सारखे उच्च शिक्षण सुरू केले. परिसरात पहिले इंग्रजी स्कूल सुरू केल्यामुळे या ग्रामीण मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय झाली. विद्यालय परिसरात व डोंगर माथ्यावर वृक्षारोपण करण्यासाठी वृक्षमित्र म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर येथील विजय यादव यांनी एक लाख रुपयांचे फळझाडे तनपुरे बाबा शिक्षण संस्थेला देण्याचे या वेळी जाहीर केले. नि:स्वार्थपणे सेवा देणार्या शिक्षण संस्थेचे यादव यांनी कौतुक केले. शिक्षण उपसंचालक टेमकर यांनीदेखील या विद्यालयातील विविध उपक्रमांचे कौतुक केले. या वेळी प्रा. परशुराम घोरपडे, विश्वस्त अबासाहेब तोडमल, राजेंद्र पाचे, विठ्ठलराव वांढेकर, माणिकराव शिंदे, प्रा. रावसाहेब मोरे, प्रा. वसंत दहे, शिक्षक, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन भास्कर कासार यांनी केले. लतेश पावसे यांनी आभार मानले.
