Breaking News

भारतीय बनावटीचे ‘तेजस’ हवाई दलात दाखल

बंगळूर, दि. 01 -  संपूर्णपणे भारतीय बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस शुक्रवारी भारतीय हवाई दलात दाखल झाले. डीआरडीओ आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणा़र्‍या या प्रकल्पातील दोन विमाने सेवेत दाखल झाली. हवाई दलामध्ये समावेश होताना स्क्वाड्रन 45  अशी ‘तेजस’च्या पहिल्या ताफ्याची ओळख असेल.
संपूर्ण भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानांसाठीची गेल्या 33 वर्षांची संरक्षण दलांची प्रतीक्षा आज संपुष्टात आली. अर्थात, हे विमान पूर्णत: भारतामध्ये तयार झाले असले तरीही त्याचे इंजिन परदेशी कंपनीचे आहे. सध्या ‘फ्लाईंग डॅगर्स‘मध्ये दोन विमाने आहेत. सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये आणखी सहा विमाने हवाई दलामध्ये दाखल होणार आहेत. 2018 ते 2020 पर्यंत ‘तेजस‘ विमानांची पूर्ण क्षमतेची तुकडी हवाई दलामध्ये असेल. हवाई दल प्रमुख अरुप राहा यांनी 17 मे रोजी ‘तेजस‘ विमानातून उड्डाण केले होते. ‘हवाई दलामध्ये समावेश करण्यासाठी ‘तेजस‘ आता सज्ज आहे,‘ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
तेजस‘ विमाने हवाई दलामध्ये दाखल होतील,‘ असे 2011 पासून सांगितले जात होते. मात्र काही त्रुटी, नियोजनातील बदल आणि इतर खोळंब्यामुळे हा प्रकल्प लांबत गेला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या विमानांचे नामकरण ‘तेजस‘ असे केले होते.