Breaking News

स्वच्छ व खड्डेमुक्त शहर करण्याचा संकल्प

 । मनपाचे महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी पदभारानंतर केले सुतोवाच 

अहमदनगर (प्रतिनिधी)। 08 - केंद्रात व राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या अनेक विविध योजनांची विकास गंगा महानगर पालिकेच्या माध्यमातून नगरकरांपर्यंत पोहचविण्यास आम्ही सदैव कटीबध्द राहू, केंद्र शासनाची सर्वांसाठी घरे ही योजना शहरात प्रभावीपणे राबविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. महापालिकेची हद्द वाढ झालेल्या उपनगरातील प्रमुख रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी मिळून स्वच्छ शहर व सुंदर शहर तसेच खड्डेमुक्त शहर साकारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. देशभर सुरु असलेल्या वृक्षरोपणाच्या राष्ट्रीय कार्यात नगरकरांचा ही सहभाग आहे. म्हणूनच आज पदभार घेतांनाच वृक्षरोपण केले आहे. असे प्रतिपादन नुतन महापौर सुरेखा संभाजी कदम यांनी सांगितले. 
केंद्र व राज्य सरकारकडून भुयारी गटार योजनेसाठी जास्तीत जास्त निधी आणणार आहोत तसेच पालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी पिंपळगाव तलाव येथे सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वीत केला जाणार आहे. या सौरउर्जा प्रकल्पातील वीज पाणी योजनेसाठी वापरणार आहेत. नेहरुमार्केट, गंजबाजार तसेच प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यापारी संकुल बांधण्याचा संकल्प आम्ही संयुक्तपणे केला आहे. म्हणूनच सेना व भाजपाच्या पदाधिकार्‍यांंच्या उपस्थित संयुक्तपणे पदभार स्विकारला असल्याचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी पदभार घेतल्यानंतर सांगितले.
महापौर सौ. कदम, उपमहापौर ि
छिंदम यांनी जाहिर केल्याप्रमाणे गुरुवारी सकाळी पदभार स्विकारला. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, संपकप्रमुख भाऊ कोरगावरकर, सेनेचे उपनेते अनिल राठोड, खा.दिलीप गांधी, अभय आगरकर, शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे, पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले, तसेच भाजप युतीचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते, यावेळी उपस्थित होते.
महापौर सौ.कदम बोलतांना पुढे म्हणाल्या, महापालिकेवर सेनेचा भगवा फडकला याचा सर्वांनाच मनस्वी आनंद झाला. शहरासह जिल्ह्यामधील शिवसैनिकांचे स्वप्न यामुळे साकार झाले. हिंंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने सेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाही आणि सेना भाजप नेत्याच्या सहकार्याने शहराच्या सर्वांगिण विकासाचा विडा सर्वांच्या साक्षीने उचलून आज पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारतानाची सर्वांची उपस्थिती मला सदैव प्रेरणा प्रोत्साहान देत राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्टसिटीचे व्हिजन देशवासीयांसमोर ठेवले आहे. नगर शहराला स्मार्टसिटीची ओळख मिळून देण्याचा प्रयास करणार आहे. मुळाडॅम येथे 800 अश्‍वशक्तीचा पंप लवकर बसविण्याचे नियोजन आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. शहर विकासात शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यासह पदाधिकार्‍याची साथ मोलाची ठरणार आहे. माझी बिनविरोध झालेली निवड सभागृह माझ्यासोबत राहणार आहे. असे गौरवद्गार सौ.कदम यांनी काढले. यावेळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अनिल कवडे, उपायुक्त बेहेरे, व इतर प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.